मुंबई - सध्या दिल्लीत संसदीय अधिवेशन सुरू असून, सभागृहात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार कळीचा मुद्दा ठरला आहे. हिंदुत्व आणि हिंदूंचा भाजपाने निवडणुकीत वापर केला, असा आरोप भाजपावर सातत्याने होतोय. आता बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचारानंतर विरोधी पक्षाकडून भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला जातोय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील हिंदूंवरील अत्याचाराला भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार असल्याचं म्हटलंय.
आज जगभरातला हिंदू संकटात : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "जगातला हिंदू संकटात आहे. आज जगभरातला हिंदू संकटात आहे, तो फक्त मोदी-शाह आणि भाजपा यांच्या स्वार्थामुळे. सर्वोच्च न्यायालयाचीदेखील याला फूस आहे. देशात निवडणुका जिंकण्यासाठी जी ठिणगी भाजपाने टाकली त्याचा परिणाम जगात हिंदू ज्या ज्या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथेच दिसून येतो. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या ठिकाणी हिंदूंवर हल्ले होताहेत, याला जबाबदार नरेंद्र मोदी यांची धोरणं आहेत."
तुमच्या सरकारमध्ये ती हिंमत आहे का?: पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "भारतात सातत्याने दंगली घडवायच्या आणि मुसलमानांना टार्गेट करायचं. प्रार्थना स्थळ खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं. आता याचा परिणाम इतर देशातील हिंदूंवर होतोय. मोदींच्या सरकारमध्ये एवढी ताकद नाही की, बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवतील. 1971 मध्ये हिंदूंवर हल्ले होत होते, तेव्हा इंदिरा गांधींनी थेट पाकिस्तानवर हल्ला केला होता. सैन्य घुसवलं आणि त्या ठिकाणच्या बांगलादेशाचंसुद्धा संरक्षण केलं होतं. पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशाला बाजूला केलं. तुमच्या सरकारमध्ये ती हिंमत आहे का?" असा सवाल खासदार संजय राऊत यांनी मोदींना विचारलाय.
मोदींचं परराष्ट्र धोरण बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित असण्याला जबाबदार : "भाजपावाल्यांनी बांगलादेशात जावं आणि हिंदूंना आधार द्यावा. संघाचे प्रमुख नेते इथे बसून पत्रक काढत आहेत. सांगा नरेंद्र मोदींना धोरणात्मक निर्णय घ्यायला. या देशात सगळ्यात जास्त धोका जर हिंदूंना कोणापासून असेल तर तो भाजपकडून आहे. गोध्रा हत्याकांड कोणी केलं? साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली? कोणी काय केलं? कशासाठी केलं? त्याचे परिणाम आज देश भोगत आहे. देशातील धार्मिक एकता संपली आहे. संविधान संपलं आहे. नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित असण्याला जबाबदार आहे," अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. नव्या सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, अद्यापही महायुतीतील घटक पक्षांमधील वाद संपल्याचं दिसून येत नाही. खाते वाटपावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच असल्याचं म्हटलं जातंय. यावरून देखील खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधलाय. राऊत म्हणाले की, "एका गृहमंत्रिपदामुळे महाराष्ट्रातील सरकार अधांतरी लटकून पडला आहे. हे कसलं मजबूत सरकार? तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. तुमच्यासोबत अजित पवार आहेत. शिंदे गटाचे लोक तुमच्यासोबत आहेत. भविष्यात ते काय करतील माहीत नाही. राजभवनात तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. राज्यपालांकडून अजून तुम्ही सत्ता स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही आधीच मांडव घातलाय? राजभवन तुम्ही चालवत आहात का?," असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय.
भाजपाने ठरवलं तर एका मिनिटात चिरडून टाकतील : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "हे एका गृहमंत्रिपदावरून थांबलेलं नाही. हे जे मागण्या करतायेत त्यांना भाजपाने ठरवलं तर एका मिनिटात चिरडून टाकतील. समोरची लोकं घाबरट आहेत. फक्त गृहमंत्रिपद सरकार स्थापनेमधला विषय असू शकत नाही. फडणवीसांच्या जागी वेगळे कोणी आणलं जातंय का? त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का? उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे. नाहीतर आम्ही आमचं पुस्तक उघडू. शिंदेंना गृहमंत्रिपद यासाठी हवा आहे, कारण त्यांना फक्त पोलिसांचे सलाम हवेत. या पदाचा वापर करून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत. दहशत निर्माण केलीय. याच यंत्रणेचा वापर करून पुढे जाऊन ते भाजपाच्या अंगावर जाऊ शकतात. त्यांची वृत्ती आणि विकृतीसुद्धा आहे. जेव्हा जेव्हा आमची पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा व्हायची, तेव्हा ते सांगायचे उद्धव ठाकरे यांनी गृहखात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये. आमचाही तेच म्हणणं होतं. गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद या सगळ्यामुळे आमचे सरकार पडलं. अन्यथा आमचं सरकार पडलं नसतं," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलीय.
हेही वाचा :