मुंबई Bombay High Court : ठाण्यातील रबाळे परिसरात अल्पवयीन मुलानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. म्हणून रबाळे पोलिसांनी पोक्सो गुन्हा दाखल केला होता. मात्र, 12 वीची परीक्षा असल्यानं अटकपूर्व जामीन अर्ज आरोपीनं दाखल केला होता. त्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकल पिठासमोर सुनावणी झाली. 12 वीची परीक्षा पाहता न्यायालयानं आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. 8 फेब्रुवारी रोजी न्यायालयानं आदेश पत्र जारी केलंय.
न्यायालयानं व्यक्त केली चिंता : ठाण्याच्या रबाळे परिसरामध्ये 17 वर्षाच्याच मुलानं 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा नोंदवला होता. मात्र आता पुढील काही दिवसात परीक्षा असल्यामुळं आरोपीच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी या निर्णयाच्या निमित्तानं निरीक्षण नोंदवत म्हणलंय की, "हे प्रकरण अत्यंत चिंताजनक आहे. मुलीची संमती हा एक महत्त्वाचा घटक यात चिंता करायला लावणारा होता. अर्थात मुलीचं वय पाहता तिच्या संमतीनं काहीही फरक पडत नाही. परंतु आरोपीचं वय देखील 18 पेक्षा कमी आहे. परीक्षा जवळ आली त्यामुळं अटकपूर्व जामीन देण्याशिवाय पर्याय नाही."
पीडित मुलीचा अटकपूर्व जामिनासाठी विरोध नाही : पीडित मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसांकडं तक्रार नोंदवली होती. तसंच मुलीला गर्भधारणा देखील झाली, हे देखील त्यांनी गुन्ह्यांमध्ये नोंदवलं होतं. मात्र, 4 फेब्रुवारी 2024 रोजी पीडित मुलीकडून असं पत्राद्वारे सांगण्यात आलं की, "अटकपूर्व जामीन देण्यास तिचा विरोध नाही." हे पत्र पोलिसांनी न्यायालयाच्या पटलावर सादर केलं. न्यायालयानं सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर या प्रकरणाकडं पाहून चिंता व्यक्त केली. "दोघांचं वय 18 पेक्षा कमी आहे. दोघांची परीक्षा आहे आणि स्वतः तक्रारदार पक्षाकडून पीडित मुलीनं अटकपूर्व जामीन देण्यास कोणताही विरोध नसल्याचं देखील म्हटलंय. बारावीची परीक्षा जवळ आलेली आहे. त्यांच्या परीक्षेत अडथळा होऊ नये, म्हणून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलाय. त्यामुळं या प्रकरणात तपास सुरु राहील," असे निर्देश देत न्यायालयानं आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
हेही वाचा :