ठाणे Heavy Rain In Thane : भातसा नदीवरील पूल महिन्याभरात चौथ्यांदा पूल पाण्याखाली गेल्यानं बाराशे ग्रामस्थांचा मागील तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. वालकस बेहरे इथल्या ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासून खडवली रस्त्याची मागणी तशीच धूळखात पडून आहे. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणं यंदाही भातसा नदीवरील 50 वर्षे जुना कमकुवत पूल पाण्याखाली गेला असून रहदारीचा पर्याय तीन दिवसापासून पूर्णपणे बंद आहे. अशावेळी वालकस बेहरे व मठाची वाडी येथील जवळपास 1200 लोकांची कोंडी झाली. गावातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रेल्वे मार्गाचा उपयोग करावा लागत आहे. मात्र या रेल्वे रुळात आतापर्यंत 13 निरपराध गावकऱ्यांचा जीव गेला आहे.
पूल पाण्याखाली गेल्यानं आदिवासी पाड्याचा संपर्क तुटला : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात वालकस बेहरे आणि मठाची वाडीसह आजूबाजूचे आदिवासी पाडे आहेत. मागील वर्षीही पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता नव्हता. यामुळे भगवान शंकर शेलार यांचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती गावकरी चेतन कडव यांनी दिली. तसेच सध्याच्या घडीला गावात वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला, आणि लहान मुलं असताना त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या वर्षीही एखादी निष्पाप व्यक्ती उपचाराअभावी आपला प्राण गमावते की काय अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
तरुणांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास : गेल्या चार वर्षांपासून गावातील तरुण आपल्या या जीवघेण्या प्रवासातून मुक्त होण्यासाठी खडवलीकडं जाणाऱ्या रस्त्याची मागणी करत आहेत. यासाठी गावकऱ्यांनी ग्राम पंचयातीपासून ते मंत्रालायपर्यंत प्रत्येक ठिकाणी निवेदनं दिली. त्यानंतर शासनाला झोपेतून जागं करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कार्यक्रमांवर बहिष्कारही टाकला. शिवाय सातत्यानं ठाणे जिल्हाधिकारी आणि कल्याण प्रांत अधिकारी याच्याकडं पाठपुरावा करत भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन मात्र फक्त गावकऱ्यांना आश्वासन देत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. तर दुसरीकडं अश्या परिस्थितीत सर्व गावकरी संतप्त असून आपला पूर्ण संसार घेऊन शासनाच्या दालनात पावसाळा संपेपर्यंत वास्तव्य करण्याच्या तयारीत असल्याचं गावातील तरुणांनी सांगितलं.
पुलाच्या कामाची निविदा मंजूर : यासंदर्भात कल्याण तहसीलदार सचिन शेजवडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी "पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील आपत्कालीन आपत्ती व्यस्थापन कर्मचारी अधिकारी यंत्रणा सज्ज असून तातडीनं मदतकार्य करण्यात येईल, तसेच कल्याण तालुक्यात वालकस, बेहरे आणि मठाची वाडी या गावात जाणाऱ्या नदीवरील नवीन पुलाच्या कामाची निविदा मंजूर होऊन कामाचा कार्य आदेश ठेकेदाराला देण्यात आला आहे. मात्र पावसाळा सुरू असल्यानं पुलाचं काम सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळं या गावात जाणाऱ्या नवीन पुलाची मागणी पूर्ण झाली असून येणाऱ्या वर्षातील पावसाळ्या पूर्वीच हा पूल तयार होणार आहे," अशी माहिती त्यांनी ईटीव्ही भारत प्रतिनिधीला दिली आहे.
हेही वाचा :
- शहापूर आणि मुरबाड तालुक्यात मुसळधार पाऊस; वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली, 18 गावपाड्यांचा संपर्क तुटला - Heavy rain in Thane district
- Bhatsa Dam Broke : भातसा धरणाच्या कालव्याला भलेमोठे भगदाड, लाखो लिटर पाणी वाया
- Bhatsa Dam Electricity Generation Stop : भातसा धरणातून होणारी वीजनिर्मिती एक वर्षांपासून ठप्प ! राज्य सरकारचे दुर्लक्ष