पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहेत. शहरात या आजाराचे १२७ रुग्ण आढळून आले आहे तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू - पुणे विभागात दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता आणि काल जीबीएसमुळे दुसरा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात राहात असलेल्या ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. तसंच १५ जानेवारी रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुण्यातील नांदेड गावातील ज्या विहिरीतून हा आजार वाढला असल्याचं सांगितलं जातं आहे, त्याठिकाणी आता महापालिका, राज्य शासन तसंच केंद्र सरकारचं पथक येऊन पाहणी करत पाण्याची चाचणी करत आहे.
जीबीएस आजाराविषयी - हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आजार आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करते. स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो. आजपर्यंत या आजाराचे एकूण १२७ रुग्ण सापडले आहेत. तसंच २ संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी ७२ रुग्णांची निदान निश्चिती देखील झाली आहे. यापैकी २३ रुग्ण पुणे मनपा तसंच ७३ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट केलेल्या गावामधील आहेत. तर १३ रुग्ण पिपंरी चिंचवड मनपा तसंच ९ रुग्ण पुणे ग्रामीण आणि ९ इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. तर यापैकी २० रुग्ण हेंटीलेटरवर आहेत.
आतापर्यंत केलेल्या उपाययोजना - शहरात वाढत असलेल्या या जीबीएस आजारासाठी राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकानं बाधित भागाला त्वरित भेट दिली आहे. तसंच पुणे मनपा आणि जिल्ह्यातील बाधित भागामध्ये सर्व्हेक्षण देखील करण्यात येत आहे. तसंच रुग्णांचे १२१ शौच नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी २१ नोरो व्हायरस आणि ५ शौच नमुने कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीसाठी पॉझीटीव्ह आले आहेत. तसंच २५ सीएसएफ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १ नमुना ईपस्टीन बार व्हायरस पॉझीटीव्ह आला आहे आणि एकूण २०० रक्तचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे पाठवण्यात आले. सर्व नमुने झिका, डेंग्यू, चिकुनगुनियासाठी निगेटिव्ह आहेत. शहराच्या विविध भागातील १४४ पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासाणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ८ पाणी नमुने स्रोत पिण्यास अयोग्य आले आहे तर घरोघरी सर्वेक्षण अंतर्गत आजपर्यंत पुणे मनपा ३४१७७ घरे, पिंपरी चिंचवड मनपा ७८५२ घरे आणि पुणे ग्रामीण १०२५४ अशा एकूण ५२२८३ घरांचे सवेक्षण करण्यात आले आहे.
नागरीकांनी घ्यावयाची काळजी - पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या या गुलेन बारी सिंड्रोम जीबी आजाराच्या बाबत नागरिकांनी पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसंच पाणी उकळून पिणे, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. तसंच वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा आणि शिळे अन्न, अर्धवट शिजलेले अन्न खावू नये नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे. तसंच नागरिकांनी या आजाराच्या प्रतिबंधासाठी काळजी घ्यावी असं आवाहन यावेळी आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हेही वाचा..