सातारा - पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराडजवळच्या मलकापूर हद्दीत शस्त्राच्या धाकाने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली. सदरची रक्कम ही व्यापाऱ्याची असून ती मुंबईहून दक्षिण भारतात हवाला मार्फत नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.
पिस्तुलांसह धारधार शस्त्रांच्या धाकाने रक्कम लुटली : हवाला मार्फत पैसे पोचविणाऱ्या कंपनीचा कारभार दक्षिण भारतातील एका मोठ्या शहरातून चालतो. संबंधित कंपनीची कार सुमारे पाच कोटींची रक्कम घेऊन सोमवारी रात्री मुंबईहून दक्षिण भारतात निघाली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कार कराडमध्ये आल्यानंतर मलकापूर हद्दीत कारला दुसरे वाहन आडवे मारून कार अडविण्यात आली. यावेळी पाच ते सहा जणांनी पिस्तुलांसह धारदार शस्त्रांच्या धाकाने कारमधील पाच कोटींची रक्कम लुटून पलायन केले.
संशयित मुंबईच्या दिशेने पळाले : कारमधील रक्कम लुटून संशयित मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे गतिमान करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. यातील मुख्य सुत्रधार अद्यापही पोलासांच्या हाती लागलेला नाही. उद्यापर्यंत यातील सर्व संशयितांना अटक होण्याची तसेच लुटलेली रक्कम हस्तगत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला गती : महामार्गावर कोट्यवधीची रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आल्यानंतर साताऱ्याचे पोलीस ओक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कड़कर कराडमध्ये तळ ठोकून होत्या. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राम ताशीलदार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही तपासले. त्या आधारे तपासाला गती देत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.