बीड : अंबाजोगाई येथील एका प्रतिष्ठित कुटुंबाविषयी सध्या शहरभर नव्हे तर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. कारण चक्क सुनेने सासू-सासरे, दोन नंदा आणि दीर यांच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलीचा विवाह अंबाजोगाई येथील हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे यांच्याशी 2 ऑगस्ट 2021 रोजी झाला. सुरुवातीचे काही महिने संसार आनंदानं सुरू होता. मात्र, या प्रतिष्ठित कुटुंबाचा क्रूर चेहरा हळुवार पुढं येऊ लागला. कुटुंबातील व्यक्तींनी सून म्हणून तिचा स्विकार केला नाही. तिच्याकडं माहेरावरुन पैसे आण असा तगादा लावला. वारंवार तिच्याकडून पैशाची मागणी करण्यात येऊ लागली आणि तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, असा आरोप पीडितेनं केला.
शारीरिक आणि मानसिक छळ : "पती हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे याचं बाहेर अनेक अफेअर असल्याचं पत्नीला समजलं. तिनं काही बोलण्या ऐवजी न बोलता काही दिवस काढले. मात्र, पत्नी काहीच बोलत नसल्यानं हर्षवर्धननं आपले रंग उधळायला सुरुवात केली. मात्र क्षमतेपेक्षा अधिक त्रास होत असल्यामुळं तिनं पतीला जाब विचारला. त्यावेळी त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिचा मोबाईल देखील फोडण्यात आला. तर तिचे सासरे चंद्रशेखर वडमारे हे अंबाजोगाई शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. या ठिकाणीच त्यांचं एक मंगल कार्यालय देखील आहे. पती हर्षवर्धन हा तीच्या पत्नीचा छळ करु लागला. सासर्याला सूनेनं सांगितल्यानंतर त्यांनी देखील जाणीवपूर्वक अनेक दिवस दुर्लक्ष केलं. पीडितेनं वडिलांना सर्व हकीगत सांगितल्यानंतर काही दिवसांनी तिनं 112 वर तक्रार केली," अशी माहिती पोलिसांनी दिली.
कपाळावर पिस्तूल रोखून दिली धमकी : चौकशीसाठी पोलीस घरी आल्यानंतर घरातील गोष्ट बाहेर जाऊ नये, म्हणून मुलीला पिस्तूलचा धाक दाखवण्यात आला. तर सासर्यानं थेट पिस्तूल डोक्याला लावून धमकावत असल्यानं ती कोणाला काही सांगत नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वीच अत्याचार डोक्याच्यावर गेला आणि थेट मुलीनं वडिलांना फोन केला. वडिलांनी देखील तत्काळ विलंब न लावता 112 ला फोन करत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यावेळी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस सूनेनं आपली आपबीती ही पोलिसांना सांगितली. अखेर या सगळ्या प्रकरणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 498 (अ) 342, 323, 504, 506, 427, 343, आणि 3/25 आर्म अॅक्टप्रमाणे तीचा पती हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे, सासरा चंद्रशेखर विष्णुपंत वडमारे, सासू अरुणा चंद्रशेखर वडमारे आणि दोन नंदा एक दीर यांच्यावर वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -