सातारा Mahabaleshwar land scam case : महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावच्या जमीन घोटाळ्याच्या मागील सुनावणीवेळी अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी (Chandrakant Valvi) आणि इतरांच्या वतीने दाखल करण्यात आलेलं वकिलपत्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील तारखेला रद्द करून समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चंद्रकांत वळवी हे बुधवारी आपले कुटुंबीय आणि नातेवाईकांसह हजर झाले. मात्र, ज्यांच्या समोर सुनावणी होती, ते अप्पर जिल्हाधिकारीच मंत्रालयातील बैठकीला गेले असल्यानं सुनावणी होऊ शकली नाही.
पुढील सुनावणी ११ जुलैला : झाडाणी जमीन घोटाळ्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींसह कुटुंबीय आणि नातेवाईकांना समक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. याप्रकरणी हजर राहिलेल्या सर्वांची हजेरी लावण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी हे मुंबईत महसूल मंत्र्यांसोबतच्या बैठकीला गेले असल्यानं पुढील सुनावणीसाठी ११ जुलै रोजीची तारीख देवून सुनावणीला उपस्थित राहण्याचा समजही देण्यात आला. त्या दिवशी संबंधितांना म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले.
सरकारी प्रक्रियेचे पालन करणार : सरकारी प्रक्रियेचे पूर्णपणे मी पालन करणार असून शासनाला चौकशीकामी सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया, जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आजच्या सुनावणीला चंद्रकांत वळवी व त्यांच्या पत्नी, पीयुष बोंगीरवार आणि त्यांच्या पत्नी, अनिल वसावे व त्यांच्या पत्नी त्याचबरोबर या प्रकरणातील तक्रारदार सुशांत मोरे आणि अन्य एक, असे ८ जण उपस्थित होते.
वळवींसह सर्वांचं वकीलपत्र केलं होतं रद्द : मागील तारखेच्या वेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींसह त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या वतीनं दाखल करण्यात आलेलं वकीलपत्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं होतं. त्यांच्या विरोधात गंभीर तक्रारी असल्यानं त्यांना समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वजण आजच्या तारखेला समक्ष हजर राहिले.
हेही वाचा -