मुंबई- आगामी जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गापासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलीय. याबाबत शिक्षण विभाग आवश्यक ती तयारी करीत असून, दोन टप्प्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार केंद्र सरकारने हा पॅटर्न लागू करण्याचे निर्देश दिलेत. त्याप्रमाणे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलीय.
शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात येणार : दोन टप्प्यात हा पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्यासाठी तयारी करण्यात येत आहे. यासाठी सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात येईल. जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता या अभ्यासक्रमासाठी अनुकूल करण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. सीबीएसई पॅटर्न राबवताना राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात येणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये मराठी सक्ती : राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलीय, त्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांनी करणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनी पुन्हा स्पष्ट केलंय. त्यामधून कोणत्याही शाळांना सवलत दिली जाणार नाही, असंही भुसे यांनी स्पष्ट केलंय.
'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्य गीतदेखील अनिवार्य : राज्यातील सर्व शाळांमध्ये 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राष्ट्रगीत म्हणणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे, त्याचीदेखील प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली/. यापूर्वी काही इतर माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यगीताचे गायन होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याचे सूतोवाच : राज्यातील शिक्षकांवर शिकवण्याव्यतिरिक्त अनेक सरकारी कामांचा ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.
शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आलीय. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना हा पॅटर्न लागू करण्याचा आमचा विचार आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
- दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
हेही वाचा :