मुंबई Gokhale and Barfiwala Bridge Open For Public : अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा गोखले पूल निकामी झाल्यानं प्रशासनाला मोठा पेच सहन करावा लागला. तसंच या भागात वाहतूक कोंडीमुळं सर्वसामान्य मुंबईकरांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. मात्र, यातून आता मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपूल यांची जोडणी पूर्ण झाली आहे. हे दोन्ही पूल गुरुवारी (4 जुलै) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. परंतु, सध्या हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आलीय.
महानगरपालिका सोशल मीडियावर ट्रोल : पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या गोखले पुलाचा एक भाग 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात कार, ऑटो आणि दुचाकी वाहनांनी पुलाचा वापर केला. पहिल्याच दिवशी वाहनचालकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, पूल खुला केल्यानंतर पालिका सोशल मीडियावर ट्रोल झाली. याचं कारण म्हणजे अंधेरी पश्चिम येथील गोखले पूल सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलासोबत जोडण्यात आला नव्हता. तसंच गोखले पुलाची उंची बर्फीवाला पुलापेक्षा दीड मीटरनं जास्त होती. त्यामुळं सोशल मीडियावर पालिकेच्या अभियंता विभागाची खिल्ली उडवली गेली. त्यानंतर यावर उपाय म्हणून पालिकेनं वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेची मदत घेण्याचं ठरवलं. तसंच तज्ञांच्या सल्ल्यानं हे काम पुन्हा सुरू करण्यात आलं.
78 दिवसांत काम पूर्ण : सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला 1,397 मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजूला 650 मिमी वर उचलण्यात आलाय. या जोडणीच्या कामासाठी गत दोन महिन्यांपासून सूक्ष्मस्तरीय नियोजन सुरू होतं. हे काम आव्हानात्मक असूनदेखील दिवस रात्र सुरू असल्यामुळं केवळ 78 दिवसांत पूर्ण झालं. 'काँक्रिट क्यूरींग'च्या कामासाठी आवश्यक 14 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या क्यूरिंगसाठी उच्च दर्जाच्या काँक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. क्यूरिंगसोबतच समांतर अशा पद्धतीनं जोडणी सांध्याचं कामदेखील पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर पुलावर विशिष्ट तासांच्या कालावधीत 'लोड टेस्ट' करण्यात आली. तर पुलांवर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते काम यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार पूर्ण करण्यात आल्याचं महानगरपालिका प्रशासनानं म्हटलंय.
चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला- या पुलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम- पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्ट्रक्चरली सेफ) असल्याचं 'व्हिजेटीआय' मार्फत घोषित करण्यात आलं. आवश्यक त्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्याबाबतचे 'ना हरकत प्रमाणपत्र' 'व्हिजेटीआय' संस्थेनं रविवारी रात्री उशिरा महानगरपालिकेला दिलं. त्यानंतर पुढील दोन दिवस पुलाच्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीनं वाहतूक व्यवस्थापनासंबंधित अनुषंंगिक कामं आणि चाचण्या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण केल्या गेल्या. यानंतर म्हणजेच 4 जुलै रोजी बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
हेही वाचा -