अमरावती : आईसोबत झालेल्या भांडणावरुन रात्री घर सोडून गेलेल्या तरुणीचं टोळक्यानं अपहरण करुन सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून या प्रकरणी पोलिसांनी 5 नराधमांना अटक केली. अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरातील तरुणीचं या नराधमांनी अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली.
तरुणीचं आईसोबत झालं भांडण : या घटनेतील पीडितेचं क्षुल्लक कारणामुळे तिच्या आईसोबत मंगळवारी रात्री भांडण झालं होतं. यामुळे रागाच्या भरात ती मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घराबाहेर पडली. रात्री एकटीच रस्त्यावर फिरणाऱ्या या तरुणीचं लगतच्या परिसरातील मुलांनी अपहरण केलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घटनेनंतर काही तासातच हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून गजाआड केलं. अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक घडला.
पीडितेनं थांबवली होती तरुणांची दुचाकी : आईसोबत भांडण झाल्यावर तरुणी गाडगे नगर पोलीस ठाण्यालगत असणाऱ्या शेगाव नाका परिसरात पोहोचली. या ठिकाणी चौकात तीनं एका दुचाकीस्वारास हात दाखवून त्याला थांबायला लावलं. दुचाकीवर दोन तरुण स्वार असताना ती देखील त्या दुचाकीवर बसली. यानंतर हे तिघंही नांदगाव पेठच्या मार्गानं निघालेत. मार्गातच एका बारवर तरुणांनी बियर विकत घेतली आणि आणखी तीन मित्रांना चार चाकी वाहन घेऊन बोलावलं. तीन मित्र चार चाकी वाहन घेऊन आल्यावर हे सारे तरुणीला घेऊन चार चाकी वाहनांमध्ये बसून नांदगाव पेठ मार्गानं निघालेत. वाहनांमध्येच त्या तरुणांनी तरुणीवर अत्याचार केला आणि शहराच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या साईनगर परिसरात त्या तरुणीला सोडून तरुणांनी पळ काढला. यानंतर पीडित तरुणीनं गाडगे नगर पोलीस ठाणे गाठून सदर प्रकरणाची तक्रार दिली.
पोलिसांनी काही वेळातच तरुणांना केलं अटक : "गाडगे नगर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत सर्वात आधी शेगाव नाका परिसरातील सीसीटीव्ही तपासलेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शेगाव नाका परिसरात आलेल्या दुचाकीस्वारांचा शोध पोलिसांनी घेतला. सर्वात आधी दुचाकीस्वार मनोज डोंगरे या लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. मनोज डोंगरे याची पोलिसांनी चौकशी केली असता, त्यानं त्याचे सहकारी भीम नगर येथील रहिवासी अक्षय सरदार, अजय लोखंडे, मिलिंद दहाट, मसानगंज परिसरातील रहिवासी प्रथम धाडसे यांची नावं सांगितल्यावर यांना देखील पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून एक चार चाकी आणि दुचाकी वाहनांसह दहा हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला," अशी माहिती गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.
हेही वाचा :