मुंबई sword to Lord Ram : प्राचीन शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या सकट बंधूंनी अयोध्येतील प्रभू रामचंद्रांना 7 फूट 3 इंच उंचीची (नंदक खड्ग) नावाची तलवार भेट दिली आहे. 80 किलो पितळ तसंच सोन्याच्या तलवारीला पौराणिक पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जातंय.
प्रभू रामचंद्रांसाठी तलवार : मुंबईतील प्राचीन शस्त्रास्त्रं बनवणारे तसंच त्यांचा अभ्यास करणारे नीलेश सकट, अरुण सकट यांनी अयोध्येत भगवान रामासाठी सात फूट तीन इंची (नंदक खड्ग) तलवार तयार केली आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयानं रामजन्मभूमीचा निकाल दिला, तेव्हाच आम्ही प्रभू रामचंद्रांसाठी तलवार बनवण्याचा निर्णय घेतला होता, असं नीलेश सकट यांनी म्हटलंय.
कशी आहे तलवार : निलेश सकट यांनी तयार केलेली तलवार 80 किलो पितळ तसंच सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. या तलावरीची उंची 7 फूट 3 इंच आहे. पुराणातील एका कथेनुसार श्रीकृष्ण यांच्या हाती हे खड्ग देण्यात आलं होतं. त्यानुसार या तलवारीची रचना आपण केली असून त्याचं नाव नंदकच ठेवण्यात आलं आहे, असं सकट यांनी सांगितलं. सकट बंधूंनी ही तलवार श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला सुपूर्द केली आहे. आपली इच्छा पूर्ण झाल्याबद्दल सकट बंधूंनी समाधान व्यक्त केलं आहे. आपले पूर्वज श्रीरंग तातू सकट, मालन श्रीरंग सकट यांच्या स्मरणार्थ ही तलवार तयार करण्यात आली आहे. ही तलवार घेऊन निलेश सकट, अरुण सकट अयोध्येत दाखल झाले आहेत.
काय आहे तलवारीचे महत्त्व : पुराणातील एका आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवांनी सुमेर पर्वतावर एका यज्ञाचं आयोजन केलं होतं. त्यावेळेस त्या पर्वतावर अचानक त्यांना लोहदैत्य राक्षस येताना दिसला. हा राक्षस आपल्या या यज्ञांमध्ये विघ्न निर्माण करेल, अशी शंका त्यांच्या मनात आली. तेव्हा त्या यज्ञाच्या अग्नीतून ब्रह्मदेवांनी एक महान बलवान पुरुष निर्माण केला. त्यानं तलवारीचं रूप धारण केल्यानंतर त्याला नंदक, असं नाव देण्यात आलं. नंतर, देवांच्या विनंतीवरून, श्रीकृष्णांनी ती तलवार घेत लोहदैत्य राक्षसाचा वध केला. म्हणून या तलवारीला नंदक खड्ग म्हणून ओळखलं जातं. त्यानुसार ही तलवार तयार करण्यात आल्याचं सकट यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :