मुंबई Mumbai Crime News : लग्नाच्या बहाण्याने आर्थिक सल्लागारावर बलात्कार केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चार्टर्ड अकाउंटंटला अटक केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडितेच्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 376 अन्वये सीए विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण : घाटकोपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय की, 2021 मध्ये सीए असलेल्या रोहित किसन मदने याच्याशी कामानिमित्त भेट झाली होती. त्यानंतर हळू-हळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. काही दिवसांनंतर पीडितेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रोहित तिला लोणावळ्याला घेऊन गेला तिथं पार्टीदरम्यान रोहितने पीडितेला जबरदस्तीनं दारू पाजली. तसंच ती नशेत असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेला आपल्यासोबत काहीतरी अनर्थ घडल्याचं जाणवलं. त्यानंतर तिनं रोहितला यासंदर्भात विचारलं असता त्यानं पीडितेला लग्नाचं आश्वासन दिलं. त्यानंतर लग्नाच्या बहाण्यानं रोहित पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत राहिला.
लग्नास नकार : काही दिवसांनंतर पीडितेनं रोहितला लग्नासंदर्भात विचारलं. मात्र, त्यानं लग्नास नकार दिला, तसंच पीडितेला तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहित किसन मदनेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. तसंच रोहितला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडितेच्या वकीलांची प्रतिक्रिया : या प्रकरणी अधिक माहिती देत पीडितेचे वकील ओजस गोळे म्हणाले की, "घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण लोणावळा पोलिसांकडे सोपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही याला विरोध केला. कारण, आरोपी हा घाटकोपरचाच असून तक्रारदार आणि आरोपी यांची भेट घाटकोपर इथंच झाली होती. त्यामुळं गुन्ह्याच्या एका भागात घाटकोपरचाही समावेश आहे. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत आरोपीला अटक केली."
हेही वाचा -