मुंबई Ganpat Gaikwad Firing Case : शिवसेना (शिंदे गटाचे) कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मागील आठवड्यात गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आता याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.
आरोपी गणपत गायकवाडसह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज (सोमवारी) शिवसेनेच्या सात मंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मंत्री दादा भुसे, संदिपान भूमरे, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड या मंत्र्यांचा समावेश आहे.
शिस्तभंगाची कारवाई व्हावी : भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी शिवेसनेच्या सात मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे साथीदार यांच्यावर कठोर कारवाई करावी तसंच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या भेटीनंतर हे प्रकरण भाजपाला चांगलंच जड जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. परंतु सात मंत्र्यांच्या या भेटीनंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर कोणती कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आम्हाला न्याय मिळेल : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर या प्रकरणी प्रतिक्रिया देत शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले की, "या प्रकरणाची गृहमंत्री गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करतील, असा आम्हाला विश्वास आहे. तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच म्हटलं आहे की, जे या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. त्यामुळं गृहमंत्री कोणताही पक्षपात न करता, आरोपींवर कारवाई करतील."
तर राज्यभर गुन्हेगारी वाढेल : महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. "एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. त्यांनी महेश गायकवाड सारखे गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवलेत. तसंच जरी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरीसुद्धा ते महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत", असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा -