गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : गंगापूर विधानसभा मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर वाळूज जवळील धामोरी शिवारात अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत सुरेश सोनवणे यांच्यासह त्यांचे सहकारी लक्ष्मण डोळस हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (18 नोव्हेंबर) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
नेमकं काय घडलं? : सुरेश सोनवणे हे सोमवारी रात्री घरी परतत असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीस हात देऊन गाडी थांबवली. त्यांना वाटलं की, ते कार्यकर्ते असावेत. त्यामुळं ते गाडीतून खाली उतरले. तेव्हा अचानक बाजूच्या शेतातून त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू झाली. त्यात सुरेश सोनवणे यांच्यासह त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. डोक्याला दुखापत झाल्यानं सुरेश सोनवणे यांना तत्काळ सीएसएमएसएस या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तपास सुरू : घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेत सुरेश सोनवणे यांची विचारपूस केली. हल्ला नेमका कुणी आणि का केला पोलीस शोध घेत आहेत. तर डोनगाव जवळही सोनवणे यांच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती सुरेश सोनवणे यांचे बंधू निलेश सोनवणे यांनी दिली आहे.
दगडफेक करुन हल्लेखोर फरार : सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक करुन हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी सुरेश सोनवणे यांचे कारचालक सुरज ज्ञानेश्वर मुंडे यांच्या तक्रारीवरुन पोस्टे वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.
हेही वाचा -