नागपुर Nagpur Tekdi Ganpati : देशभरात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. नागपूरच नाही तर विदर्भ, मध्यप्रदेश आणि शेजारच्या राज्यातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं टेकडी गणपती मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलंय. यानिमित्तानं आपण नागपूरच्या टेकडी गणपतीविषयी जाणून घेणार आहोत.
अनेक दिग्गजाचं श्रद्धास्थान : लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असल्यानं गणेश भक्तांची पावलं विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी टेकडी गणेश मंदिराकडं वळली आहेत. नागपूरकरांचं आराध्य दैवत तसंच प्राचीन मंदिरांपैकी एक अशी ओळख गणेश टेकडी मंदिराची आहे. या ठिकाणी असलेली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. टेकडीच्या गणपतीचा 350 वर्षे जुना इतिहास आहे. हे मंदिर अनेक दिग्गजाचं श्रद्धास्थान आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आदींसह अनेक दिग्गज या मंदिरात दर्शनासाठी येतात.
टेकडी मंदिराचा काय आहे इतिहास : इंग्रजांची सत्ता असताना राजे भोसले आणि ब्रिटिशांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली. त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचं पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्यानं भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात हे मंदिर खूप छोटं होतं. त्यानंतर हळूहळू टेकडी गणपती मंदिर मोठं करण्यात आलं. या मंदिरातील श्रीगणेशाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्तीची सोंड उजवीकडं आहे. या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग देखील आहे.
टेकडी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असा विश्वास आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ इथं पाहायला मिळते.
हेही वाचा
- ठाण्यात टिळक आळीत बाप्पा झाले विराजमान; कारागृहातून सुटल्यानंतर टिळकांनी केलं होतं भाषण - Ganesh Chaturthi 2024
- नितीन गडकरींच्या निवासस्थानी एक नाही तर दोन बाप्पा झाले विराजमान... - Ganeshotsav 2024
- लोणची-पापड नाही तर.. गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांनी घेतली गरुड भरारी; कोट्यवधींची केली उलाढाल - Ganeshotsav 2024