मुंबई Ganeshotsav 2024 : ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या घोषणा देत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला जड अंतकरणानं भाविकांनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. मुंबईतील जुहू, दादर आणि गिरगाव चौपाटीवर तसेच महापालिकेनं तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये लाडक्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं.
37 हजार 879 घरगुती बाप्पांचं विसर्जन : मुंबई शहरात एकूण 37 हजार 879 घरगुती बाप्पांचं तर 195 सार्वजनिक गणपती मूर्तीचं आणि वीस हरतालिका यांचं उशिरा रात्री दहा वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आलं. यापैकी 143 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कृत्रिम तलावात गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं. त्याचप्रमाणं अठरा हजार 537 घरगुती गणपती बाप्पांचे आणि सोळा हरतालिका यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे.
चौपट्यांवर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन : मोठ्या चौपट्यांवर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन केल्यानं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कृत्रिम तलावांची संकल्पना आणली. कृत्रिम तलावांचा गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. दीड दिवसांच्या बाप्पांना साश्रु नयनांनी भाविकांनी निरोप दिला. दीड दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा अर्चा करून त्याचे लाड पुरवून भाविकांनी बाप्पाचा निरोप घेतला. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' अशा घोषणा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचंही विसर्जन : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. ठाण्यातील मासुदा तलावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.
हेही वाचा :
- 'लालबागच्या राजा'ची पहिल्या दिवशीची दानपेटी उघडली; पहिल्याच दिवशी किती दान? - Lalbaugcha Raja Donation
- पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 'स्त्री शक्ती'चा जागर; 35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण अन् महाआरती - Ganeshotsav 2024
- गणेशोत्सव 2024; नवसाला पावणारा नागपूरचा "टेकडी गणपती", 350 वर्षांचा आहे इतिहास - Ganeshotsav 2024