मुंबई : बुधवारी सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरीकडं निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने जोरात धडक दिल्यानंतर अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ९० हून अधिक जण जखमी झाले. काही कळायच्या आतच हा सर्व प्रकार घडल्यानं सर्वत्र हाहाकार माजला होता. परंतु नशीब बलवत्तर म्हणून गडचिरोली येथून मुंबई दर्शनासाठी आलेल्या आणि बोटीत बसून जल प्रवासाचा जीवनातील पहिला आनंद घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचण्याचं टायमिंग चुकलं आणि ते एका मोठ्या दुर्घटनेपासून बचावले.
पोहचण्यास उशीर, जलप्रवास चुकला : मुंबई नगरी पाहण्यासाठी देशभरातून नाही तर विश्वभरातून पर्यटक मुंबईत येतात. मुंबईला आल्यावर पर्यटकांचं सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे 'गेट वे ऑफ इंडिया'. याच गेट वे ऑफ इंडियाला लागून असलेल्या समुद्रात बुधवारी सायंकाळी ३:५५ वाजता नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने जोरदार धडक दिली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर दोन तासाने गडचिरोली या ग्रामीण नक्षलग्रस्त भागातून मुंबई दर्शनासह मुंबईत जल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी ३७ विद्यार्थी आपल्या गुरुजींसह गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचले. येथे पोहचल्यावर या विद्यार्थ्यांना इथे नेमकं काय झालं आहे, याची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या शिक्षकांनी घटनेची माहिती घेतली. परंतु विद्यार्थ्यांना त्याची कल्पना दिली नाही. कारण विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी गुरुवारी जल प्रवासाचा आनंद घ्यायचा होता. अशात हे विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी त्याचबरोबर गडचिरोली सारख्या भागातून असल्याकारणाने त्यांना कशाचीही भीती नाही. परंतु, जर का हे विद्यार्थी दोन तासापूर्वी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचले असते आणि त्यांनी जल प्रवासाचा आनंद घेतला असता तर काय घडलं असतं हे कुणीही सांगू शकत नाही.
धीट विद्यार्थी पाण्याला घाबरत नाहीत : गडचिरोलीतल्या कुरुड येथील राधेश्याम बाबा विद्यालयातील ३७ विद्यार्थी महाराष्ट्र, मुंबई दर्शनासाठी बुधवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर, पुणे, आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना भेट दिली. त्यानंतर मुंबईत गेटवे ऑफ इंडिया दर्शन आणि त्यासोबत जल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी ते मुंबईत आले. "गुरुवारी दुपारी शिक्षकांसह गेटवे ऑफ इंडिया येथे बोटीतून जल प्रवासाचा आनंद घेतला. बोटीतून घेतलेल्या पाऊण तासाचा जलप्रवास हा सुखावणारा होता. यापूर्वी कधीही आम्ही बोटीतून फिरलो नव्हतो." असं एका विद्यार्थिनीने सांगितलं.
बोट दुर्घटनेची माहिती नव्हती : एकंदरीत मुंबईतील आणि महाराष्ट्रातील प्रवासाबाबत बोलताना या विद्यार्थ्यांचे शिक्षक दुधाराम नाकडे म्हणाले, "विद्यार्थ्यांची फार इच्छा होती की त्यांना मुंबईत बोटीने प्रवास करायचा होता. याकरता आम्ही बुधवारी सायंकाळी येथे पोहोचलो. परंतु येथील वातावरण बघून आम्ही गुरुवारी येथे येऊन बोटीतून फिरण्याचा निर्णय घेतला. बुधवारी जी बोट दुर्घटना झाली त्याबाबत आम्हाला माहिती होती, परंतु आम्ही ती माहिती विद्यार्थ्यांना दिली नाही. तसंही त्यांना जर का माहिती दिली असती तरी हे सर्व विद्यार्थी ग्रामीण, त्याचबरोबर गडचिरोली सारख्या भागातील असल्यामुळं फार धीट आहेत. परंतु मुंबईसारख्या मायानगरीत आल्यानंतर इथे काही अप्रिय घटना घडली आहे, असं त्यांना सांगावसं वाटलं नाही". गेट ऑफ इंडिया येथे बोटीतून जल प्रवासाचा आनंद घेतल्यानंतर हे विद्यार्थ्यांनी मुंबईत नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी, उद्योगपती मुकेश अंबानी यांची अंटालिया ही निवासी इमारत सुद्धा पहिली. त्यानंतर हे विद्यार्थी रात्री शनिशिंगणापूर येथे जाणार आहेत.
झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी : बोटीचे मेकॅनिक रफिक सुर्वे म्हणाले, "गेल्या अनेक वर्षापासून आमचा आणि समुद्राचा जवळचा संबंध आहे. मागील २५ वर्ष बोटीवर मेकॅनिकचं काम करत आहे. बुधवारी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी अशी होती. मागील २५ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अपघात पाहिले आहेत. परंतु अशा पद्धतीचा अपघात कधीच पाहिला नव्हता. वास्तविक स्पीड बोट नीलकमल या बोटीला धडकायलाच नको होती. स्पीड बोटीला दोन इंजिन असल्याकारणानं ती चालकाला मागे घेता आली असती. परंतु त्याने तसं का केलं नाही हे अजून कोडचं आहे. यासोबतच सेफ्टी मेजर्स प्रत्येक बोटीवर असणं सुद्धा बंधनकारक आहे. परंतु अनेकदा याकडं दुर्लक्ष होतं".
हेही वाचा -