छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Crime News : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारचा 'गब्बर' (Gabbar) चित्रपट प्रचंड गाजला होता. ज्यात अक्षय कुमार आणि त्याच्यासोबत असलेले उच्चशिक्षित इमानदार युवक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतात. आता हा 'गब्बर' छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेत आलाय. कारण गब्बर या नवानं पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून "गब्बर इज बॅक" असं म्हणत लाचखोरांना सोडणार नाही असा मजकूर लिहला आहे. त्याचबरोबर काही जणांची नावं टाकून पालकमंत्र्यांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. या प्रकरणी पोलीस त्या पत्राचा तपास घेत असल्याची माहिती, पोलीस अधीक्षक मनील कलावनिया यांनी दिलीय. तर समाज माध्यमांवर हे पत्र वाऱ्यासारखं पसरत असल्यानं जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शंभर जणांची गँग तयार केल्याचा दावा : पोलीस महासंचालक यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या बिडकीन येथून एक निनावी पत्र पाठवण्यात आलंय. यात पत्र लिहिणाऱ्याचा 'गब्बर' असा उल्लेख करण्यात आला आहे. बिडकीन तालुक्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत असून पोलीस मात्र त्याकडं कानाडोळा करत आहेत. त्यामुळंच आता एक मोठं हत्याकांड आम्ही घडवून आणणार आहोत असा इशारा, या पत्रात देण्यात आलाय. त्यामध्ये पोलीस अधीक्षक यांच्यापासून तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यापर्यंत अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिक यांना जिवंत सोडणार नाही असं नमूद करण्यात आलं आहे. इतकच नाही तर आता आमच्याकडं शंभर लोकांची गॅंग आम्ही तयार केली असून त्या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्यांना भर चौकात आम्ही फाशी देऊ असा इशारा या पत्रातून देण्यात आलाय. विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीनं "रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा" असा उल्लेख देखील पत्रात केलाय. त्यामुळं संभाजीनगरमध्ये या गब्बरची जोरदार चर्चा असून हा गब्बर कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी केला तपास सुरू : मंगळवारी एक निनावी 'गब्बर' नावानं पत्र व्हायरल झालं असून त्याची चौकशी आता आम्ही करत आहोत. त्यामुळं या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांचं नाव असल्यानं एकच खळबळ संभाजीनगरमध्ये उडाली होती. त्यामुळं ही व्यक्ती नेमकी कोण आहे याची पूर्ण खात्री करून कारवाई करण्यात येईल, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलीय.
हेही वाचा -