मुंबई Sketch Artist Nitin Yadav : गेल्या 30 ते 32 वर्ष होऊन गेली नितीन यादव पोलिसांसोबत रेखाचित्र काढण्याचे काम अतिशय निष्ठेने आणि नि:शुल्क करत आहेत. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या नितीन यादव यांनी वडील गिरणी कामगार असून देखील आपली कला अतिशय कर्तबगारपणे सांभाळत एका उंचीवर नेऊन ठेवली. मुंबई पोलीस दलात प्रसिद्ध असलेल्या नितीन यादव या चित्रकाराने आजवर 5 हजार हून जास्त आरोपींची रेखाचित्रे रेखाटली आहेत. शाळेपासूनच नितीन यादव यांना चित्रकलेची एवढी आवड होती की, ते वर्गात शिक्षणाचा तास सोडून शिक्षकांची चित्रे रेखाटायचे. त्यामुळे गिरणी कामगार असलेल्या वडिलांनी माझ्यातला चित्रकार पाहिला आणि मला मार्गदर्शन केले. म्हणूनच पोलीस नसूनही पोलिसांएवढीच महत्त्वाची कामगिरी करणारे चित्रकार नितीन यादव आहेत.
शिक्षणासाठी सोसावा लागला त्रास : नितीन यादव पुढे सांगतात की, मी काढलेली लहानपणीची चित्रे त्यांनी सांभाळून ठेवली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना माझे वडील माझे चित्रे दाखवू लागले. गिरणीचा संप झाल्यामुळे नितीन यादव यांना नववी, दहावीत शिक्षण घेताना खूप त्रास सोसावा लागला. त्यामुळे आर्थिक अडचण आल्याने शाळेत असल्यापासूनच नितीन यादव यांनी बॅनर्स, रिक्षाचा नंबर प्लेट, टॅक्सीचा नंबर प्लेट्स आणि पोलीस पाट्या रंगवायला सुरुवात केली. पोलिसांची ट्रान्सफर झाली की, त्या पोलीस ठाण्यात पोलीस पाटी रंगवायला जायचो, अशी माहिती चित्रकार नितीन यादव यांनी दिली आहे.
अशी झाली रेखाचित्रांची सुरुवात : आता कॉम्प्युटरचा डिजिटल जमाना आल्यानं नकाशे रेडीमेड उपलब्ध होतात. मात्र, तीस वर्षांपूर्वी नितीन यादव यांनी पोलिसांच्या बिटचे नकाशे बनवले आहेत. हे करता करता पहिली मर्डरची केस जीएसके हॉटेलमध्ये घडली आणि त्यावेळी नितीन यादव हे नंबर प्लेट रंगवत होते. खूप गर्दी झाली होती. त्यावेळी पोलिसांना नितीन यादव यांनी विचारलं काय प्रकार आहे? पोलिसांनी सांगितलं मर्डर झाली आहे. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्ती बाबत मी माहिती विचारली असता पोलिसांनी तो साक्षीदार असल्याचं सांगितलं. त्यावर साक्षीदार काही माहिती सांगू शकेल का? अशी विचारणा नितीन यादव यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी माझं ऐकलं आणि त्या आरोपीचे रेखाचित्र रेखाटण्याचं काम पोलिसांनी मला दिलं, अशी माहिती नितीन यादव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे. येथूनच नितीन यादव यांच्यातला हाफ पोलीस जागा झाला आणि त्यांनी गुन्हेगारांची रेखाचित्रे एका कोऱ्या कागदावर उमटवण्यास सुरुवात केली.
हेही वाचा :
- आयटीचा जॉब सोडून तरुण वळला शेतीकडं; पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या शेतीतून कमवतोय लाखो रुपये - White Jamun Farming
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील निकाल ठाकरे गटाच्या जिव्हारी; घेतला 'हा' मोठा निर्णय - Vinayak Raut defeat
- इचलकरंजी महानगरपालिकेत दोन आयुक्तात रंगला 'खुर्चीवाद', दोघांनीही थाटल्या एकाच दालनात खुर्च्या - Ichalkaranji Commissioner Dispute