पुणे FTII Poster Controversy : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटमाटात पार पडला. यावेळी देशभर मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी दिवे लावून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली. दरम्यान, पुण्यातील प्रख्यात 'भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था' (FTII) मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला.
काय घडलं : मंगळवारी, एफटीआयआयमध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली. येथे 'Remember Babri' (बाबरीला आठवा) आणि 'Death of Constitution' (संविधानाचा मृत्यू) अशा आशयाचे बॅनर दिसले. यावरून हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी, एफटीआयआयमध्ये घुसून बॅनर लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलंय. यामुळे सध्या एफटीआयआय मध्ये तणावाचं वातावरण आहे.
पोलिसांकडून कारवाईचं आश्वासन : या घटनेबाबत पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी अधिक माहिती दिली. "एफटीआयआयमध्ये मंगळवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थी संघटनेनं एक बॅनर लावला होता. याद्वारे त्यांनी निषेध व्यक्त केला होता. यानंतर 7 ते 8 जण कॅम्पसमध्ये आले आणि त्यांनी तो बॅनर फाडला. या दरम्यान बाचाबाचीही झाली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. तपास करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल", असं संदीप गिल म्हणाले.
या आधी झालेले वाद : FTII आणि वादाचं नातं तसं जुनं आहे. संस्थेच्या संचालकपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. चौहान यांचं सिने जगतात फारसं योगदान नाही, ते केवळ संघ आणि भाजपाशी संबंधित असल्यानं त्यांची नियुक्ती करण्यात आली, असा आरोप डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. FTII चं भगवेकरण करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.
हे वाचलंत का :