पुणे Pune Glass Factory Mishap : पुण्यामधील येवलेवाडी परिसरात काचेच्या कारखान्यात भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेबाबत पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
कशी घडली घटना? : अग्निशमन विभागाचे अधिकारी समीर शेख यांनी सांगितलं की, "येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात कामगार माल ट्रकमधून खाली उतरवत असताना तो अचानक कामगारांच्या अंगावर पडला. यात अनेक कामगार दबल्याची माहिती मिळाली होती. लगेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्यानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आलं. कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं." यात चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोन कामगार जखमी झालेत.
चार कामगारांचा मृत्यू : या कारखान्यात झालेल्या अपघातात विकास सर्जू प्रसाद गौतम (वय 23), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय 40), पवन रामचंद्र कुमार (वय 44) आणि अमित शिवशंकर कुमार (वय 27) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. तर दोन कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काचेचे तुकडे अंगात घुसल्यानं मृत्यू : येवलेवाडी येथील सीएनजी पेट्रोल पंप मागे 'इंडिया ग्लास सोल्युशन' नावानं काचेचा मोठा कारखाना आहे. याठिकाणी मोठं-मोठे काच आणल्या जातात. त्याठिकाणी काचेवर प्रक्रिया करून त्या विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. रविवारी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास ट्रकमधून काच उतरवून घेण्याचं काम 10 कामगार करत होते. मोठे काचेचे स्लाईड खाली उतरवत असताना बांधण्यात आलेला बेल्ट तुटला आणि दोन मोठे काचेचे स्लाईड या कामगारांच्या अंगावर पडले. काचेचे तुकडे अंगात घुसल्यानं चार कामगारांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.
हेही वाचा