चंद्रपूर Touching live electrical wires : जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शानं शॉक लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपूर या गावात घडली आहे. नानाजी राऊत (वय 55), प्रकाश राऊत (45), युवराज डोंगरे (43), पुंडलिक मानकर अशी मृतकांची नावं आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरू आहे.
जागीच मृत्यू - या प्रकरणाची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसात शेतं देखील पाण्यात बुडाली आहेत. दोन दिवस कोणी बांधावर गेले नाही. आज गणेशपूर येथील नानाजी राऊत, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे, पुंडलिक मानकर हे शेताच्या बांधावर गेले असता जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण यात जखमी झाला. या घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलीस विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसंच उपविभागीय अधिकारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून एकाच वेळी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वन्यजीवांचा प्रादुर्भाव - एकीकडे अशी घटना घडली असताना, ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. तृणभक्षी आणि हिंस्र प्राणी यामुळे शेतीचं फार मोठं नुकसान होतं. अशावेळी यापासून आपल्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी बरेच शेतकरी आपल्या शेताच्या परिसरामध्ये विद्युत तारेचा प्रवाह सोडतात. त्यामुळे अनेकदा वन्यजीवांचा किंवा मानवाचा देखील मृत्यू होतो. ही घटना देखील त्यापैकीच एक आहे का, याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा..