नाशिक Girl Kidnapped And Raped : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 वर्षाच्या युवकानं गावातीलच साडेचार वर्षाच्या बालिकेचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूर घटनेपाठोपाठ नाशिक जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळं मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
अपहरणाचा गुन्हा दाखल - मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील वावी गावात घरासमोरून साडेचार वर्षाच्या बलिकेचं परिचित असलेल्या एका तरुणानं 19 तारखेला अपहरण केलं. सायंकाळी उशिरापर्यंत ही बालिका घराजवळच कुठेतरी खेळत असेल म्हणून तिच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं होतं. मात्र अंधार पडल्यानंतरही ती घरी न आल्यानं तिचा शोध सुरू झाला. यातील आरोपी तरुणाबरोबर या बलिकेला दुपारी चार वाजेच्या सुमारास बघितलं असल्याचं काहींनी सांगितलं. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह गावातील ग्रामस्थांकडून या दोघांचाही शोध सुरू होता. संशयित तरुणाचा मोबाईल फोन बंद असल्यानं तसंच तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळं त्याच्यावरील संशय बळावला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बलिकेच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांसमवेत वावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी तत्काळ निफाडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांना माहिती दिली. पोलिसांनी लागलीच अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला.
लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न - मंगळवारी दुपारी गावातील निर्जन ठिकाणी संशयित बलिकेसह तरुण आढळून आला. त्याला पोलीस पथकानं ताब्यात घेतलं. त्यानंतर अपहरण केलेल्या बलिकेची देखील सुखरूप सुटका केली. तिची तत्काळ दोडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बालिकेच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून - नाशिक जिल्ह्यात हे प्रकरण घडल्यानंतर उल्लेखनिय बाब म्हणजे, चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून स्वातंत्र्य दिनाला झेंडा वंदनासाठी शाळेत सात वर्षीय चिमुकला गेला असता त्याचंही अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना आठवते. त्याचा गळा आवळून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित किशोर मोकणे याच्या विरोधात पॉक्सो,अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ वडनेर भैरव गाव एक दिवस बंद ठेवण्यात येऊन गावकऱ्यांनी मोर्चा काढत आरोपीला कडक शासन करावे अशी मागणी केली होती.