मुंबई Sanjay Pandey On Parambir Singh : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम हळूहळू वाजू लागत असतानाच उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीदेखील वर्सोवा मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. वादग्रस्त आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांचे खंडन संजय पांडे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलत असताना संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले संजय पांडे? : यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना संजय पांडे म्हणाले की, "आपण निवडून दिलेल्या उमेदवाराच्या भेटीसाठी मतदारांना काही तास रांगेत उभं राहावं लागतं. तसं न होता आमचं पारदर्शक काम असेल. ज्या जनतेनं आम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिलं, त्या जनतेसाठी आम्ही पाच वर्षांसाठी त्यांच्यासोबत राहून काम करणार आहोत. माझ्या घराचं दार सदैव मतदारांसाठी खुलं असणार आहे. माझा फोननंबरदेखील सर्वांना देण्यात येईल." " मी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त असतानादेखील नागरिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना माझा नंबर दिला होता. तेव्हाही मी सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचो," असंही संजय पांडे यांनी सांगितलं.
निवडणूक अपक्षच लढणार : पुढं ते म्हणाले की, "कोणत्याही राजकीय पक्षानं अद्याप माझ्याकडं संपर्क साधलेला नाही. त्यामुळं मी अपक्षच लढण्याचा निर्णय घेतलाय. माणसानं स्वतंत्र राहायला पाहिजे. म्हणून मी स्वतंत्र निवडणूक लढवलेली चांगली. जनतेनं समर्थन दिलं तर आम्ही नक्कीच जिंकून येणार आहोत. उद्धव ठाकरेंनी अजून संपर्क साधलेला नाही. पण जर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी देण्याचा विचार केला तर मीसुद्धा विचार करेन."
नार्को टेस्टविषयी काय म्हणाले? : परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांचीदेखील नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी केलीय. यासंदर्भात संजय पांडे यांना विचारण्यात आले असता, " नार्को टेस्ट करण्याकरिता मी काय आरोपी आहे का? असा सवाल करत त्यांनी परमबीर सिंग यांची मागणी धुडकावून लावली.
हेही वाचा -
- "मी कधीच असं सांगितलं नाही", परमबीर सिंग यांच्या आरोपावर जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर - Jayant Patil On Param Bir Singh
- अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले.." झूठ बोले..." - Devendra Fadanvis On Anil Deshmukh
- "माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदा..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis