ठाणे : मिरा-भाईंदर शहरात नव्यानं उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्यास भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी कडाडून विरोध केलाय. सदरचा प्रकल्प रद्द करा अन्यथा इमारतीवरून उडी मारू, असा थेट इशारा त्यांनी पालिका प्रशासनाला दिलाय. येणाऱ्या 10 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम देत रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचं मेहता यांनी जाहीर केलं. त्यामुळ कत्तलखान्याचा विषय चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते.
कत्तलखान्याची गरज काय? : शहरात मुस्लिम, ख्रिश्चन आणि मासांहार खाणारे नागरिक शहरात मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळं अनेक वर्षापासून कत्तलखाना उभारण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगानं पालिका प्रशासनानं भाईंदर पश्चिमेच्या उत्तर परिसरात कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेत 40 कोटी रुपये खर्च करण्याचं निश्चित करण्यात आलं. त्याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली. मात्र, हा सगळा प्रकार गुपचूप सुरू असून या निविदेत घोळ आहे. तसंच स्थानिक आमदार राजकीय स्वार्थापोटी राजकारण करत असल्याचा आरोप मेहता यांनी केला. खाणारे, विक्री करणाऱ्यांचा मला त्रास नाही, पण कत्तलखान्याची गरज काय? जीव गेला तरी चालेल परंतु कोणत्याही परिस्थितीत मिरा-भाईंदर शहरात कत्तलखाना होऊन देणार नाही, असं मेहता यांनी सांगितलं.
गीता जैन यांच्यावर गंभीर आरोप : नरेंद्र मेहता यांनी रविवारी पत्रकार परिषद आयोजित करून कत्तलखान्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार गीता जैन यांच्यावर गंभीर आरोप केले. स्थानिक आमदार जैन समाजाच्या असून त्यांना कत्तलखाना पटलाच कसा? असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला. एवढा मोठा प्रकल्प स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता प्रशासन करूच शकत नाही. स्थानिक आमदार आपल्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत, असा आरोप मेहता यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, सदरची निविदा व प्रकल्प तात्काळ रद्द करावा. या शहराला कत्तलखान्याची गरज नाही, अशी मागणी देखील मेहता यांनी पत्रकार परिषदेतून केली.
मेहता यांची स्टंटबाजी : "विकास आराखडा अद्यापही मंजूर झालेला नाही. तांत्रिकदृष्ट्या महापालिका प्रशासनानं चुकीच्या पद्धतीने निविदा काढली. मागील दोन दिवसापासून पालिका आयुक्त नाहीत. त्यामुळं मी स्वतः उद्या सोमवारी पालिका आयुक्तांनी भेट घेणार आहे. प्रशासनाला ती निविदा रद्द करावीच लागणार. मेहता यांना तांत्रिक बाब माहिती नाही का? ते आठवी नापास असल्यामुळं त्यांना याची माहिती नसेल, असा पलटवार आमदार गीता जैन यांनी केला. लोकांची दिशाभूल स्वतः मेहता करत आहेत आणि प्रशासनाला ही निविदा रद्दच करावी लागणार आहे, मग आंदोलन करायची गरज काय? उगाच स्टंटबाजी करून लोकांची दिशाभूल करायचं काम सुरू आहे, असं आमदार गिता जैन म्हणाल्या.
हेही वाचा
- 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज; ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये 'इतक्या' दिवसांत जमा होणार - Ladki Bahin Yojana
- शिवसेनेत परतलेल्यांना शिक्षा देणार? "मुख्यमंत्र्यांचं कार्ट..." म्हणत उद्धव ठाकरेंचं श्रीकांत शिंदेंवर टीकास्त्र - Uddhav Thackeray Attacked
- तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाईला मानाचा शालू अर्पण, शालूची किंमत किती? जाणून घ्या - Tirupati Shalu for Ambabai