मुंबई Satya Pal Malik Meet Uddhav Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मलिक यांनी 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. बैठकीनंतर सत्यपाल मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मलिक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. तसंच भाजपावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीवर भाष्य : मुंबईत माध्यमांशी बोलताना सत्यपाल मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडासाफ होणार, असं सत्यपाल मलिक म्हणाले. तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माझा पाठिंबा असेल. मी महाविकास आघाडीचा प्रचार करेन, असंही सत्यपाल मलिक यांनी जाहीर केलं. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुका लांबवल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. पराभवाच्या भीतीनं केंद्र सरकार निवडणुका लांबवत असल्याचं ते म्हणाले.
माजी राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक ह्यांनी आज मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. pic.twitter.com/flHA8H2bAF
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 22, 2024
निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौरा करणार आहे. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी 'ग्रीन सिग्नल' मिळणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली. रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गाठीभेटींमुळं राजकीय वर्तळात अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच सत्यपाल मलिक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.
महाविकास आघाडीला मिळणार बळ? : सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत. अनेकवेळा त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता. आता त्यांनी थेट महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 'एन्ट्री' घेतल्यानं महाविकास आघाडीला बळ मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. तर दुसरीकडं भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसलेले सत्यपाल मलिक यांच्यामुळं राज्यातील भाजपा नेत्यांना येणाऱ्या काळात आरोपांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ला, अदानी प्रकरणावरुन मलिक हे कायम भाजपावर निशाणा साधतात.
हेही वाचा