छत्रपती संभाजीनगर Foraging Camp : मराठवाड्यात भीषण दुष्काळाची चाहूल सुरु झालीय. माणसांचा पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना, जनावरांच्या चारा आणि पाण्याबाबत शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी चारा छावणी सुरु करण्याची मागणी होत असतांना, गंगापूर तालुक्यात भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी मात्र खासगी चारा छावणी सुरु केलीय. स्वतः आणि मित्रांच्या माध्यमातून "तालुक्यातील आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खासगी चारा छावणी सुरु केली असून, शासनानं मदत केली नाही, तरी जितके जनावर येतील त्यांची व्यवस्था केली जाईल," अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिलीय.
पहिल्याच दिवशी पाचशे जनावर छावणीत : गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी इथं राज्यातील पहिली खासगी चारा छावणी सुरु करण्यात आलीय. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चातून आणि मित्रांच्या सहकार्यानं ही चारा छावणी सुरु केली. मराठवाड्यात भीषण दुष्काळ पुन्हा एकदा येणार असल्याची चाहूल लागत आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाईचा सामना लोकांना करावा लागतोय, त्यामुळं यंदा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवलीय. त्यात निवडणुकीच्या धामधुमीत अद्याप चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला गेलेला नाहीये. मात्र परिसरातील शेतकऱ्यांची मागणी असल्यानं स्वखर्चातून ही चारा छावणी सुरू केल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. पहिल्याच दिवशी जवळपास 500 जनावरं छावणी मध्ये दाखल झाली आहेत, तर कितीही जनावरं आली तरी त्यांची व्यवस्था करु असं प्रशांत बंब यांनी सांगितलंय.
अद्यावत चारा छावणी होणार : खोजेवाडी इथं एका व्यावसायिकाचे तीस-तीस फुटांचे तीन गोडाऊन चारा छावणीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. यात जवळपास बाराशे जनावरं मावतील इतकी व्यवस्था करण्यात आलीय. या ठिकाणी अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्यानं शेतकऱ्यांनी आपली जनावरं सोडल्यानंतर त्यांची देखरेख होती का नाही हे त्यांना घर बसल्या पाहता येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात अडीचशे टन चारा विकत घेण्यात येत असून, टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांना लागणारी औषध हे देखील चारा छावणीत उपलब्ध असतील. दुष्काळ पडत असल्यानं चारा आणि पाण्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विक्री करु नये याकरिता हा प्रयत्न करत असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली. तर प्रशासनानं अद्याप चारा छावणी बाबत कुठलेही निर्णय घेतले नाही, मात्र येणाऱ्या काळात त्यांनी निर्णय घेऊन मदत करावी, अशी मागणी करत शासनानं मदत केली नाही तरी आम्ही ही छावणी सुरू ठेवणार, असं आ. प्रशांत बंब यांनी सांगितलं.
चारा टंचाई होण्याची शक्यता : यंदा कमी पर्जन्यमान झाल्यानं भीषण पाणीटंचाईचा सामना मराठवाडा करत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा भीषण अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं, त्या अनुषंगानं उपाय योजना जिल्हा पातळीवर केल्या जात आहेत. जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याबाबत टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चारा वाहतुकीवर निर्बंध लावले आहेत. जिल्ह्यातील चारा जिल्ह्यातच राहावा, याकरिता, जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा नेण्यासाठी बंदी घालण्यात आलीय. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पशुगणनेनुसार जिल्ह्यात 4 लाख 74 हजार 752 मोठी जनावरं आहेत तर 11 लाख 58 हजार 251 लहान जनावर आहेत. एकूण 6 लाख 33 हजार 3 जनांरे असून, त्यांना रोज 33330 मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते. मागणीनुसार चारा जिल्ह्यात उपलब्ध असावा, याकरिता निर्णय घेतल्याची माहिती, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
हेही वाचा :