अमरावती Firing on Bus : अमरावती नागपूर महामार्गावर तिवसा लगत एका खासगी बसवर रविवारी मध्यरात्री अचानक गोळीबार झाल्यामुळं खळबळ उडालीय. या धक्कादायक घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान गोळीबार केल्यावर बस घटनास्थळावरुन निघून गेल्यावर आरोपींनी याच मार्गावर एका ट्रकवर गोळीबार करुन ट्रक मधील माल लुटल्याच्या थरारक घटनेमुळे या महामार्गावर खळबळ उडालीय.
काय आहे घटना? : नागपूर येथील काही भाविक शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी 17 सीटर खासगी बसनं गेले होते. शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेतल्यावर रविवारी सायंकाळी हे भाविक अमरावतीला श्री अंबादेवी मातेच्या दर्शनासाठी आले होते. अंबादेवीचं दर्शन घेतल्यावर भाविकांची खासगी बस नागपूरच्या दिशेनं निघाली असताना नांदगाव पेठ ते तिवसा पोलीस ठाण्यादरम्यान अज्ञात आरोपींनी या बसवर चालकांच्या दिशेनं गोळीबार केला. या गोळीबारात बसच्या खिडकीच्या काचा फुटल्यामुळं प्रवासी जखमी झाले. या घटनेत चालक देखील जखमी झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांसह तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त सागर देशमुख हे देखील घटनास्थळी पोहोचले. या घटनेतील सर्व चारही जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
उत्तर प्रदेशातील वाहनातून आले हल्लेखोर : या घटनेबाबत बस चालक खोमदेव खवळेंनी माहिती दिली की, "नांदगाव पेठपासून उत्तर प्रदेशचं पासिंग असणारी बेलोरा गाडी आमच्या बसचा पाठलाग करत असल्याचं माझ्या लक्षात आलं. नांदगाव पेठ टोलनाक्यानंतर काही अंतरावरच बोलेरो गाडीतील इसमांनी आमच्या बसवर गोळीबार केला. एक गोळी माझ्या हाताला लागल्यामुळं मी जखमी झालो. मात्र मी आमची बस थेट तिवसा शहरात आल्यावरच थांबवली."
ट्रकवरही गोळीबार : खासगी बसवर गोळीबार करुन बस थांबली नसल्यामुळं या आरोपींनी याच मार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकवर गोळीबार केला. यानंतर ट्रक थांबताच चालकाला पकडून मारहाण केली आणि ट्रकमधील माल लुटून आरोपींनी पळ काढला. बस आणि ट्रकवर गोळीबार करण्याची घटना रविवारी मध्यरात्री अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवेवर घडल्यामुळं या महामार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये दहशत पसरली. ही घटना अतिशय गंभीर असून अमरावती ते नागपूर दरम्यान रात्री अनेक वाहन धावतात. या दोन्ही घटनेनंतर बराच वेळ पर्यंत नांदगाव पेठ आणि तिवसा दरम्यान अनेक वाहनं थांबली होती.
हल्लेखोरांचा शोध सुरु : महामार्गावरुन धावणाऱ्या बस आणि ट्रकवर गोळीबार करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांचा तिवसा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर आरोपी अमरावतीच्या दिशेनं पळाल्याचा अंदाज असून आरोपींचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात असल्याची माहिती तिवसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी दिलीय.
हेही वाचा :