सातारा Sahyadri Wildlife Research : महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात 32 वाघांचा (Tiger) वावर असल्याची माहिती समोर आली. महाराष्ट्रातील सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मदतीनं तयार केलेला अहवाल कराडमधील सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यांपिढ्या प्रजनन करत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद या अहवालात करण्यात आली आहे.
जैवविविधतेवरील संशोधन सादर : कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजम यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे अतिरिक्त महानिरीक्षक नंदकिशोर काळे, दापोली वानिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीश नरखेडे, कृष्णा मेडिकल कॉलेजचे कुलसचिव एम. व्ही. घोरपडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संशोधकांनी सह्याद्री लँडस्केप, गवताळ प्रदेश, सडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आदी विषयांवरील संशोधन सादर केलं.
10 हजार चौ. कि. क्षेत्रात वाघांचा भ्रमणमार्ग : या संशोधनाचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात असणारे महत्त्व आणि भविष्यातील संशोधनाच्या संधींवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडं कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प, असा 10 हजार 785 चौरस किलोमीटर क्षेत्रावर सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो. या भ्रमणमार्गाच्या क्षेत्रात संरक्षित वनक्षेत्राबरोबरच खासगी आणि सरकारी मालकीचे क्षेत्र, गाव, महामार्ग, रेल्वेमार्ग, धरण अशा अनेक गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळं या भ्रमणमार्गात अनेक ठिकाणी अडथळे अर्थात बॉटलनेक दिसतात. अशा परिस्थितीत देखील वाघांच्या संख्येचे अवलोकन करण्याचं काम डब्लूसीटीनं वन विभागाच्या मदतीनं केलं.
पश्चिम महाराष्ट्रात दहा वाघांची नोंद : या अहवालात कर्नाटकमधील 17 आणि गोव्यातील 5 वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर पश्चिम महाराष्ट्रामधील 10 वाघांच्या छायाचित्रांची नोंद अभ्यासातून केली गेली आहे. ही संख्या केवळ भ्रमणमार्ग भूप्रदेशातील असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प किंवा राधानगरी वन्यजीव अभयारण्यासारख्या संरक्षित वन क्षेत्रामधील वाघांच्या संख्येचा यात समावेश नाही.
मादी वाघिणीचं पिढ्यानपिढ्या प्रजनन : सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशामध्ये मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याचं समोर आलं आहे. 2015 साली याठिकाणी जन्मास आलेल्या एका मादी वाघिणीने याच भूप्रदेशात तीन पिल्लांना जन्म दिला होता. मे 2018 मध्ये चांदोली अभयारण्यात आढळलेला टी-31 हा नर वाघ मे 2020 मध्ये कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात आढळून आला होता. तसेच 2018 मध्ये महाराष्ट्रात छायाचित्र टिपण्यात आलेली टीटी 7 नामक वाघीण जवळपास चार वर्षानंतर 30 जून 2021 रोजी गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळली होती.
वन अधिकाऱ्यांचा गट ठेवणार वाघांच्या हालचालींवर लक्ष : सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी झालेल्या गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांची समन्वय बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भातील समन्वयावर चर्चा करण्यात आली. राज्यांतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच वनधिकाऱ्यांचा गट तयार करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजम यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- World Tiger Day : प्राणी संग्रहालयात रंगला वाघांच्या बछड्यांची नावे ठेवण्याचा कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांनी ठेवली वाघांची नावे
- International Tiger Conservation Day: कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन दिनी वाघांची संख्या ३०० होण्याची अपेक्षा
- World Tiger Day : जागतिक व्याघ्रदिनी केंद्रीय पर्यावरण मंत्री चंद्रपुरात; अधिकाऱ्यांचा करणार सत्कार