पुणे Pune Crime: लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्यानं अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या माजी सैन्य कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सदर्न कमांडच्या 'मिलिटरी इंटेलिजन्स'कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंढवा येथील लुल्लानगरमध्ये ही कारवाई केली. विनायक तुकाराम कडाळे (रा. गंगाधाम, डीएडी कॉम्प्लेक्स, लुल्लानगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. कडाळेसह त्याची पत्नी दीपाली विनायक कडाळे हिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 लाख 50 हजारांची केली फसवणूक : याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी विनायक कडाळे यानं आर्मी कमांड हॉस्पिटलमधील लेखापाल (लेखापाल-नागरी सेवा) या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर आरोपीनं अनेकांना माझी भारतीय सैन्य दलात ओळख असून कमांड हॉस्पिटलमध्ये भरती सुरू असल्याचं सांगितलं. आरोपीनं फिर्यादी अनिशा खान यांच्याकडून नोकरीसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले. आरोपीनं मार्च 2021 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सुमारे सात ते आठ जणांकडून 13 लाख 50 हजार रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सापळा रचत आरोपीला अटक : अनिशा खान यांनी आरोपीकडं पैशाची मागणी केली असता त्याला काही रक्कम परत देण्यात आली. मात्र बाकी राहिलेले पैसे न दिल्यानं अनिशा खान यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी सांगितलं की, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यानं राहत्या घराचा पत्ता बदलला. आरोपी कोंढवा येथील लुलानगर असल्याची माहिती मिळताच लष्कराच्या ‘मिलिटरी इंटेलिजन्स’ तसंच कोंढवा पोलिसांच्या पथकानं सोसायटीबाहेर सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली.
हे वचालंत का :