नागपूर Colonel Vaibhav Kale Killed In Gaza : युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये नुकतेच रुजू झालेले भारतीय सैन्य दलातील कर्नल वैभव अनिल काळे ( निवृत्त ) यांना वीरमरण प्राप्त झालं आहे. हॉस्पिटलची तपासणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं. कर्नल वैभव काळे हे गाझा येथून रफा येथील युरोपियन रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं, अशी माहिती पुढं येत आहे. त्यांचं शालेय शिक्षण नागपूरच्या भवन्स विद्यामंदिरात झालं आहे.

वैभव काळे संयुक्त राष्ट्रांच्या सेवेत : सुमारे दोन महिन्यांपूर्वीचं निवृत्त कर्नल वैभव काळे संयुक्त राष्ट्रांमध्ये सहभागी झाले होते. ते एका कर्मचाऱ्यासह यूएन फ्लॅग असलेल्या अधिकृत वाहनातून रफाह येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना झालेल्या हल्ल्यात ते ठार झाले. इस्रायल आणि हमास हल्ल्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मानला जात आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. वैभव काळे यांनी जम्मू काश्मीर रायफल्स या तुकडींतर्गत विविध आघाड्यांवर सेवा दिली आहे. 22 वर्षांच्या सेवेनंतर 2022 मध्ये त्यांनी भारतीय सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत उच्च पदावर सेवेत होते. मात्र नोकऱ्या सोडून त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत ‘यूएनडीएसएस’मध्ये सेवा सुरू केली. त्यांची पहिलीचं पोस्टिंग ही गाझापट्टीत रफाह इथं झाली होती.

दोन महिन्यापूर्वीच झाले होते सेवेत दाखल : कर्नल वैभव अनिल काळे यांनी भारतीय सैन्यदलातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर ते दोन खासगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये समन्वयक म्हणून सेवा सुरू केली होती. दोन महिन्यापूर्वीच ते या पदावर रुजू झाले होते. सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांना पहिली पोस्टींग गाझामध्ये मिळाली. मात्र गाझामध्ये रफाह इथं जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. याबाबतची माहिती यूएन विभागाच्या माध्यमातून एक्सवर पोस्ट करत देण्यात आली आहे.
हेही वाचा :