अमरावती Amravati News : घराच्या बाहेर पडायचं, बाहेर पडल्यावर नेमका काय अनुभव येतो हे जाणून घ्यायचं, या उद्देशानं अवघ्या अठरा वर्षीय अथर्व संतोष ताकपिरे या विद्यार्थ्यानं केवळ 18 हजार रुपयांत आठ राज्यात महिनाभर भ्रमंती केली. अथर्व हा अमरावती शहरातील राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू आहे. तो श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील बीएस्सीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. अवघे 18 हजार रुपये घेऊन घराबाहेर पडलेला अथर्व आठ राज्यातील विविध अनुभव घेऊन घरी परतला आहे. अथर्वने आपल्या या सोलो ट्रिपचा अनुभव 'ईटीव्ही भारत' शी बोलताना शेअर केला.
'या' आठ राज्यात केला प्रवास : अथर्व 30 डिसेंबर 2023 ला अमरावतीतील वडाळी येथून बाहेर पडला. त्यानंतर तो रेल्वेनं थेट पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पोहोचला. त्यानंतर तेथून त्यानं आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, या ठिकाणी भ्रमंती केली. पुढं उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि मथुरा फिरल्यावर तो थेट मध्य प्रदेशातील इंदूरला गेला. त्यानंतर तेथून तो राजस्थानला गेला आणि अखेर महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेण्या पाहून तो 29 जानेवारीला आपल्या घरी परतला.
18 हजार रुपयांत वास्तवात अनुभवलं स्वप्न : आपल्या या भ्रमंती संदर्भात अधिक माहिती देत अथर्व म्हणाला, "कोरोना काळात युट्युबवर जगभरात विविध ठिकाणी भ्रमंती करणाऱ्या अनेक पर्यटकांचे व्हिडिओ पाहायचो. त्यांचा थरारक अनुभव पाहून मजा यायची, मात्र कॅमेरा ठेवल्यावर त्यांचं जगणं नेमकं कसं असेल याचा सातत्याने विचार यायचा. आपण देखील एकट्यानेच असंच विविध ठिकाणी फिरून यायचं असं वाटायला लागलं. त्यामुळंच मी सोलो ट्रिपला जाण्याचं ठरवलं. सुरुवातीला माझ्या या निर्णयाला आई-वडिलांनी विरोध केला. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. काहीही होणार नाही असा विश्वास मी त्यांना देत होतो. अखेर आजी, काका, मावशी यांनी इच्छा आहे तर कर असं म्हणत मला थोडे पैसे दिले. मी पण काही पैसे जमा केले होते. बाबांनी देखील त्यांच्या जवळचे काही पैसे दिले. असे सर्व मिळून माझ्याकडे 18 हजार रुपये जमा झाले. हे 18 हजार रुपये घेऊन मी बाहेर पडलो आणि महिनाभर माझ्या स्वप्नातील जगणं मी अनुभवलं. आपल्या देशात फिरायला जास्त पैसे लागत नाही फक्त आत्मविश्वास हवा."
असे आलेत अनुभव : "आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये फिरताना त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक वाहनांमधूनच ठरवलेले ठिकाण गाठावे लागले. नेमकं कुठं जायचं हे आधीच निश्चित असल्यामुळं ठरवलेल्या ठिकाणांवर मी पोहोचायचो. बस आणि ट्रेन याद्वारेच मी प्रवास करायचो. केवळ अरुणाचल प्रदेशमध्ये कनेक्टिव्हिटीच्या अडचणीमुळं प्रवास करताना अडचणी आल्या. त्यामुळं तिथं मला इतर ठिकाणांपेक्षा थोडा अधिक खर्च आला. तर मेघालयात फिरताना उमंगट नदीच्या काठावर एक-दोन पर्यटक तंबू टाकून मुक्कामी असल्याचे दिसले. मी देखील सोबत आणलेला माझा तंबू उमंगट नदीच्या काठावर रोवला. या नदीकाठीच आपल्या तंबूत मी रात्र काढली."
मथुरेत आला 103 डिग्री ताप : "त्यानंतर उत्तर प्रदेशात वाराणसी शहरातील मंदिर पाहून मथुरेला पोहोचलो. तेव्हा त्या ठिकाणी मला 103 ताप आला. इतक्या छान प्रवासात माझ्यासमोर घरापासून हजार किलोमीटर अंतरावर उभं ठाकलेलं हे एकमेव संकट होतं. त्यादिवशी मी औषध गोळ्या घेतल्या आणि आराम केला. सुदैवानं मी पटकन बरा झालो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. मथुरेत फिरल्यानंतर मी मध्य प्रदेशातील इंदूरला आलो. इंदूर शहर फिरल्यावर राजस्थानला गेलो. राजस्थानातील हवा महल पाहिला. गप्पागोष्टी केल्यामुळं प्रवासात अनेक जण आपलेसे झाले. राजस्थानमध्ये देखील चांगले मित्र मिळाले. कोणाच्या बाईक वरून प्रवास केला तर कोणी आपल्या कार मधून देखील मला सोबत नेले. एकूणच या सर्व राज्यात कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवास केल्यावर मी राजस्थानातून थेट आपल्या महाराष्ट्रात आलो", असं अथर्वने सांगितले.
जलतरणपटू असणाऱ्या अथर्वला व्हायचंय सिनेमॅटोग्राफर : अथर्व ताकपिरे याने शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अनेकदा सहभाग घेतला आहे. गुजरातच्या पोरबंदर येथे झालेल्या 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेतही एक चांगला स्पर्धक म्हणून अथर्व ताकपिरे याने पारितोषिक पटकाविलं आहे. उत्कृष्ट जलतरणपटू असणाऱ्या अथर्वला भविष्यात सिनेमेटोग्राफर होऊन छायाचित्रीकरण आणि संकलन या क्षेत्रात भवितव्य घडवायचं असल्याचं त्यांने सांगितलं.
हेही वाचा -