सातारा Bride Carry Bullock Cart : लग्न सोहळ्यांना पूर्वीचा पारंपरिक बाज राहिलेला नाही. वारेमाप खर्च, बँन्ड, बँजो, डॉल्बी आणि धिंगाणा असं हल्लीच्या लग्न समारंभाला स्वरूप आलं आहे. अशा वातावरणात देखील काही लग्न समारंभ हटके पद्धतीनं होतात. त्याची सर्वदूर चर्चा देखील होते. असाच एक विवाह सोहळा गुरुवारी सातारा तालुक्यात पार पडला. अमेरिकेला नांदायला जाणाऱ्या उच्च शिक्षित तरुणीनं आपल्या लग्नाचं वऱ्हाड चक्क बैलगाडीतून नेत गावची खंडित परंपरा सुरू केली.
नवरीनं हाकली खिल्लारी बैलांची गाडी : साताऱ्यातील सोनवडी गावचे रहिवासी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी विमलाकर कारंडे यांची कन्या आदितीचा गुरुवारी विवाह होता. ती उच्च शिक्षित असून लग्नानंतर ती अमेरिकेत नांदायला जाणार आहे. आपल्या गावची खंडित परंपरा सुरू व्हावी म्हणून लग्नाचं वऱ्हाड बैलगाड्यांमधून नेण्याचा हट्ट तिनं वडिलांकडे धरला होता. तिच्या हट्टानुसार वीस बैलगाड्यांतून लग्नाचं वऱ्हाड वाजत-गाजत नेण्यात आलं. आदितीनं स्वत: बैलगाडी हाकली. नवरीकडील नातेवाईक आणि मित्रमंडळी उत्साहानं मिरवणुकीत सहभागी झाली होती.
सोनवडी गावची खंडित परंपरा लेकीनं केली सुरू : सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनवडी गावाला सैनिकांचा तसेच सांप्रदायिक वारसा आहे. लग्नाचं वऱ्हाड खिल्लारी बैलजोड्या जुंपून बैलगाडीतून नेण्याची या गावाला परंपरा होती. मागील वीस-पंचवीस वर्षांत ती परंपरा खंडित झाली होती. आपल्या निमित्तानं ती परंपरा पुन्हा सुरू व्हावी म्हणून तिनं बैलगाडीतून आपलं वऱ्हाड घेऊन जाण्याचा हट्ट वडिलांकडे धरला. तिच्या या हट्टाचं ग्रामस्थांनी तोंडभरून कौतुक केलं.
परंपरा कायम राखण्याची ग्रामस्थांची ग्वाही : बैलगाड्यांमधून वऱ्हाड नेण्याची सोनवडी गावची अनेक वर्षांची खंडित झालेली परंपरा उच्च शिक्षित तरुणीनं पुन्हा सुरू केल्यामुळं गावातील ज्येष्ठ मंडळी खूष झाली. अमेरिकेला नांदायला जाणार असतानाही तिनं गावची परंपरा आणि आपल्या मातीशी नाळ घट्ट राखल्याचा अभिमान असल्याची भावना सोनवडी ग्रामस्थांनी बोलून दाखवली. तसेच यापुढे ही परंपरा कायम राखण्याची ग्वाहीदेखील दिली.
हेही वाचा-