नवी दिल्ली Election Commission Press Conference : लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी मंगळवारी (4 जून) पार पडेल. मतमोजणीच्या एक दिवस आधी, केंद्रीय निवडणूक आयोगानं आज म्हणजेच सोमवारी (3 जून) दुपारी 12.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. निवडणूक आयोगानं माध्यमांना दिलेल्या निमंत्रणानुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत भारत निवडणूक आयोग ही पत्रकार परिषद घेणार आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत मतदानाची टक्केवारी आणि मतमोजणीबाबत आयोगातर्फे महत्त्वाची घोषणा होऊ शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून अशी पत्रकार परिषद घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर उपनिवडणूक आयुक्त पत्रकारांना माहिती देत असतात. परंतु आता ही प्रथा रद्द करण्यात आलीये. त्यामुळं आज सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा निवडणूक आयोगाकडं लागल्या आहेत.
जयराम रमेश यांच्या दाव्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 150 जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून चर्चा केली होती, असा दावा केला होता. त्यांच्या याच दाव्याबद्दल निवडणूक आयोगानं रविवारी त्यांच्याकडून तपशील मागितला होता. यासंदर्भात त्यांना एक पत्र पाठवून रविवारी संध्याकाळच्या आत दाव्यांबद्दल तपशील देण्यास सांगण्यात आलं होतं.
एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या विजयाची शक्यता : 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. यामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपा सरकार स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आला. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये एनडीए 350 हून अधिक जागा मिळवेल असा दावा करण्यात आलाय. मात्र, इंडिया आघाडीनं हे एक्झिट पोल स्वीकारण्यास नकार दिलाय. या निवडणुकीत इंडिया आघाडी 295 जागा जिंकेल, असा दावा विरोधकांकडून केल्या जातोय.
हेही वाचा -
- मतमोजणीसाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट; मतमोजणी केंद्राचा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा - Lok Sabha Elections 2024
- यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी थांबवा; नागपूर खंडपीठात याचिका - Anil Rathod Pleads
- तळीरामांना दिलासा! लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच 'ड्राय डे' येणार संपुष्टात, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय - Lok Sabha Election 2024