मुंबई - डंपिंग ग्राऊंडच्या समस्येतून सुटका करण्यासाठी पालिकेने एक अनोखी शक्कल लढवली असून, यासाठी पालिकेने मुंबईतील सर्व 24 वॉर्डांमधील कचरा संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याची योजना आखली आहे. मुंबई आता झपाट्याने वाढतेय. या वाढत्या लोकसंख्येबरोबर कचऱ्याचीसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण मुंबई शहराचा कचरा ज्या दोन डंपिंग ग्राउंडवर जमा केले जातो, त्यातील सर्वात मोठे देवनार डंपिंग ग्राउंड आता ओव्हर फ्लो झालंय. त्यामुळे आता मुंबईतील कचऱ्याचा सर्व भार कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राउंडवर आहे. देवनार येथील डंपिंग ग्राउंड पूर्ण क्षमतेने भरल्याने तिथे आता कचरा टाकला जात नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व कचरा हा कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंड येथे पाठवला जातो.
पालिकेकडून मुंबईत कचरा संकलन केंद्रांची निर्मिती : कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राउंडची क्षमता देखील आता फार जास्त राहिलेली नाही. येता काही काळात हे डंपिंग ग्राउंडदेखील पूर्ण क्षमतेने भरणार आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने मुंबईत कचरा संकलन केंद्रांची निर्मिती केली होती. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील सुक्या कचऱ्याचा ताण काहीसा कमी झाला. मात्र, आता या कचरा संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, या आधुनिकीकरणामुळे रोजगारनिर्मिती देखील होणार असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंड पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर : मुंबईत सध्या 24 विभागांत 46 कचरा संकलन केंद्र आहेत. आता या कचरा संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण केल्याने डंपिंग ग्राउंडवर जाणाऱ्या सुक्या कचऱ्याच्या प्रमाणात मोठी घट होणार असल्याचे पालिकेचे म्हणणं आहे. सोबतच या सुक्या कचऱ्यावर त्या त्या विभागातच प्रक्रिया करणे शक्य होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. एका बाजूला मुंबईसाठी नव्या डंपिंग ग्राउंडची आवश्यकता असताना पालिकेला अद्यापही नव्या डंपिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध झालेली नाही. अशातच कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राउंडदेखील पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे डंपिंग ग्राउंडवर जाणारा सुका कचरा कमी होऊन डंपिंग ग्राउंडवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेने म्हटलंय.
संकलन केंद्रांमुळे रोजगार निर्मिती : या संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण केल्यानंतर सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अधिक सुलभ होणार आहे. या संकलन केंद्रांवर सुका कचरा एकत्र आणला जातो. एका कन्वेअर बेल्टवर हा कचरा टाकून कचरा वेचक महिला या कचऱ्याचे वर्गीकरण करतात. यातील विक्री होणाऱ्या वस्तू विक्रीसाठी पाठवल्या जातात. तर ज्या वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करणे शक्य आहे, त्या रिसायकलिंगसाठी पाठवल्या जातात. उरलेला अनावश्यक भाग हा डंपिंग ग्राउंडवर पाठवला जातो. या संकलन केंद्रांमुळे रोजगार निर्मिती झाली असून, त्याचे आधुनिकीकरण केल्यास आणखी रोजगार उपलब्ध होईल, असा पालिकेला विश्वास आहे. या संदर्भात बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर म्हणाले की, या संकलन केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार होता. आजघडीला मुंबईत मर्यादित संकलित केंद्रे असल्याने या संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय, यासाठी सीएसआर फंडाची मदत घेण्याचा विचारदेखील प्रशासन करीत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या संकलन केंद्रांचे आधुनिकीकरण केल्यास यांची कचरा संकलनाची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास मदत होणार असल्याचंही बोललं जातंय.
हेही वाचा :