नागपूर Hit And Run Case Nagpur : उपराजधानीतील 'हिट अँड रन' प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये सनी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश निमोरिया यांचा समावेश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सनी चव्हाण, अंशुल ढाले हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर नागपूर शहरातील काही पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. नाझमिन शेख वसीम शेख असे अपघातातील जखमी महिलेचे नाव आहे तर जोहान वसीम शेख असे त्या बाळाचे नाव आहे. (Car Accident Case Nagpur) या शिवाय सचिन सूर्यभान सुभेदार हे देखील अपघातात जखमी झाले आहे. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आई आणि बाळाची तब्येत नाजूक आहे.
आरोपी दारूच्या नशेत : नागपूर शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल परिसरातील काल (शुक्रवारी) रात्री झेंडा चौकात एका कार चालकाने सुसाट वेगाने कार चालवत रस्त्यावर चालणाऱ्या तीन लोकांना जोरदार धडक दिली. या घटनेत एक महिला आणि त्याचे तीन महिन्यांचे बाळ अत्यंत गंभीर जखमी झाले आहे. त्यांना काही स्थानिक लोकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. कारचालक आणि त्याच्यासोबत गाडीत बसलेले त्याचे दोन सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते, गाडीत दारूच्या बाटल्या आणि गांजाची पुडी सापडली आहे.
महिला आणि बाळाची तब्येत नाजूक : या अपघात महिला आणि तिचे दीड महिन्याचे बाळ हे गंभीर जखमी झालेले आहे. बाळाच्या डोक्याला ईजा झाली असून आज सिटी स्कॅन नंतर नेमकी स्थिती काय आहे हे कळणार आहे. तर महिलेच्या एका पायाचे आणि कंबरेचे हाड फॅक्चर झाले असून शरीरावर गंभीर दुखापत झाली आहे, अशी माहिती त्या महिलेच्या पतीने दिली आहे. या अपघातात जखमी बालकाचे वय केवळ ४५ दिवस इतके आहे. बाळाचे आई-वडील बाळाला वॅक्सिनसाठी (लस) देण्यासाठी रुग्णालयामध्ये जात होते. मात्र, वाटेतचं अपघात झाला.
नागरिकांना संताप अनावर : काही दिवसांपूर्वी पुण्यात एका श्रीमंत बापाच्या बिघडेल पोराने दारूच्या नशेत दोघांना अक्षरशः आपल्या महागड्या गाडीने दोघांना उडवत त्यांचा जीव घेतला होता. त्यानंतर पैश्याच्या जोरावर त्यांनी जे काही केलं त्यामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यात काल रात्री ही घटना घडल्यानंतर लोकांना राग अनावर झाला आणि त्यांनी कारची तोडफोड करत एका आरोपीला बेदम मारहाण केली आहे.
आरोपींची आज न्यायालयात हजेरी : अपघाताकरिता कारणीभूत असलेल्या तीनही आरोपींना तहसील पोलीस आज न्यायालयात हजर करतील. पोलीस त्यांची रिमांड मागणार आहेत. त्यानंतर पोलिसांना या आरोपींकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहे. ती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. त्यात प्रामुख्याने कारमध्ये सापडलेला गांजा कुठून आणला होता, कुणाला देण्यासाठी जात होते याचे उत्तर पोलीस मिळवणार आहेत.
हेही वाचा :
- गनपावडर निर्मितीच्या कारखान्यात स्फोट, घरांना बसले हादरले! - Chhattisgarh Blast
- शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा; 'या' दोन नेत्यांना उमेदवारी - Vidhan Parishad Election 2024
- मुलाच्या अपहरणाच्या बनाव करणाऱ्या आई-वडिलांनीच केली हत्या, पोलिसांनी कसा केला तपास? - Jogeshwari Crime News