नाशिक : महिनाभरापूर्वी इंगळे नगर येथील जेलरोड परिसरात एका कुटुंबातील सहा वर्षाच्या मुलाच्या डोक्याला पिसाळलेल्या श्वानानं चावा घेतला होता. त्यानंतर चिमुरड्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार केल्यानंतर संबंधित चिमुरड्याची तब्येत महिन्याभरानं अचानक खराब झाली. त्यामुळं त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारानंतर त्याचा मृत्यू झालाय. डॉक्टरांनी त्याला रेबीजची लागण झाल्याचा संशय व्यक्त केलाय.
अशी घडली घटना : 4 जुलै रोजी मर्चंट्स बँकेच्या शाखेजवळील सायबर कॅफेमध्ये सरकारी योजनेचा अर्ज भरण्यासाठी भरतरीनाथ गजरे त्याच्या आईसोबत आला होता. यावेळी एक पिसाळलेल्या श्वानानं त्याच्या डोक्याला चावा घेतला. त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला बिटको शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. गेल्या महिन्यात त्याला इंजेक्शनही देण्यात आलं. परंतु दोन दिवसांपूर्वी त्याला अचानक ताप आल्यानं त्याची प्रकृती अचानक बिघडली. पुन्हा त्याला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथ उपचार सुरू असताना 7 ऑगस्टला मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
पाच दिवसांपूर्वी झाला होता वाढदिवस : भरतरीनाथ हा जेलरोड परिसरातील एका शाळेत सिनियर केजीमध्ये शिक्षण घेत होता. मुलानं चांगलं शिक्षण घ्यावं म्हणून त्याचे आई-वडील लोकांच्या काबाडकष्ट करतात. त्याचे वडील एका शाळेत वॉचमन म्हणून काम करतात. तर आई लोकांच्या घरी घरकाम करते. त्यांच्या एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्यानं गजरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 2 जुलैला कुटुंबियांनी भरतरीनाथचा 6 वा वाढदिवस आनंदानं साजरा केला होता. अवघे पाच दिवस होत नाही, तोच त्याची प्राणज्योत मलावली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- रेबीज आजाराची लक्षणे : पिसाळलेले श्वान चावल्यानंतर रेबीज आजार होण्याचा धोका अधिक असतो. श्वान चावल्यानंतर 90 ते 195 दिवसात दिसतात ताप, अंगदुखी, मेंदू, मणक्यात सूज, रुग्णाचं वागण्यात बदल होतो. तसंच रुग्ण हायपर होऊन त्याला पाण्याची भीती वाटू लागते, अशी काही लक्षणे रुग्णात आढळून येते.