मुंबई Maratha Reservation : मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिके विरोधात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. एखादा राज्याचा मंत्री एखाद्या समाजासाठी अशा प्रकारची भूमिका घेऊ शकत नाही. भुजबळांच्या कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यानं चर्चेत राहिले आहेत. राज्यातील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना संदर्भात त्यांनी 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कामं असल्याच्या त्यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटला होता. 2021 साली त्यांनी ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी देखील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी - चाकणकर : अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा त्यांनी जाहीर शब्दात निषेध केला आहे. गायकवाड यांच्या अशा सातत्यानं केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळं बुद्धीहीन वैचारिकतेचं प्रदर्शन मांडलं असून त्यांच्या बुद्धीची कीव येते असंही चाकणकरांनी म्हटलं आहे. अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी सभागृहात असणं म्हणजे दुर्दैवच आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांना समजेल अशा भाषेत समज द्यावी, असं आवाहन रूपाली चाकणकर यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
भाषा जपून वापरावी - छगन भुजबळ : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आपण ते वक्तव्य ऐकलं आणि वाचलं थोडं वाईट वाटलं. संजय गायकवाड माझा राजीनामा मागताय. राजीनामा मागण्याच्या अधिकार सर्वसामान्य जनतेला आहे, तसा आमदारांनासुद्धा आहे. त्याबाबत आपलं काहीही म्हणणं नसल्याचं भुजबळ म्हणाले; परंतु वापरलेली भाषा बरोबर नाही. मला त्यांना सांगायचं, ''अरे बाबा शिवसेनेच्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण सिनिअर प्रोफेसर असल्याचा'' खोचक टोला संजय गायकवाड यांना लगावला.
स्फोटक विधान - अनिकेत जोशी : मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं विधान हे राजकीयदृष्ट्या स्फोटक असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी दिली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले एक आमदार मंत्र्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करतात. यातून लोकांमध्ये संभ्रम पसरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेऊन संजय गायकवाड यांना समज द्यावी लागणार आहे.
हेही वाचा: