अमरावती : सातपुडा पर्वतरांगेत विस्तारलेल्या मेळघाटात काही ठिकाणी सतीशिळा आढळतात. युद्धभूमीत आपल्या पतीसह सती जाणाऱ्या तसंच आपलं पावित्र्य जपण्यासाठी सती गेलेल्या महिलांच्या स्मरणात सतीशिळा तयार करून त्या विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची प्रथा मेळघाटात वास्तव्यास असणाऱ्या गवळी साम्राज्याच्या काळात रुजली होती. चिखलदरा तालुक्यात घनदाट जंगलात वसलेल्या बदनापूर या गावालगत एका शेत शिवारात अशीच सतीशिळा आढळते. स्थानिक रहिवासी देव मानून या सतीशिळेची पूजा करतात. विशिष्ट अशा दगडावर अर्थात सतीशिळेवर चंद्र, सूर्य, महिला अर्थात सतीचा हात यासोबतच खालच्या भागात घोड्यावर बसलेले स्त्री-पुरुष शिळेवर कोरले आहेत. या शिळेच्या वरच्या भागात एक कळस कोरण्यात आला. सतीशिळेची परंपरा, प्रथा नेमकी काय आहे? सती प्रथा भारतात कशी रुजली? तिचा अस्त कसा झाला? या संदर्भात "ईटीव्ही भारत"चा हा स्पेशल रिपोर्ट.
बदनापूर गावालगत अशी आहे सतीशिळा : "मेळघाटच्या जंगलात वसलेल्या चिखलदरा तालुक्यात बदनापूर या गावालगत एका शेतात रस्त्याच्या कडेला अनेक वर्ष जुनी अशी सतीशिळा आढळून आली. या सतीशिळेवर महिलेचा डावा हात असून हातात महिलेच्या सौभाग्याचं लेणं असणाऱ्या बांगड्या कोरलेल्या आहेत. यासोबतच चंद्र सूर्य अंकित केलं असून जोपर्यंत चंद्र, सूर्य राहतील, तोपर्यंत त्या महिलेचं अमरत्व अबाधित राहील, असं दर्शवण्याचा प्रयत्न सतीशिळेवर असणाऱ्या सूर्य आणि चंद्राच्या माध्यमातून करण्यात आला. संबंधित महिला ज्या परिस्थितीत सती गेली, तो प्रसंग सतीशिळेच्या खालच्या बाजुला कोरण्यात आला," अशी माहिती या सतीशिळेचा शोध लावणारे शिव स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
महिलांची विटंबना टाळण्यासाठी रूढ झाली सती प्रथा : "भारतात परकीय आक्रमणांना सुरुवात झाली, त्यावेळी युद्धात मारल्या जाणाऱ्या सैनिकांच्या पत्नींची विटंबना होऊ नये, या उद्देशानं सती प्रथा रूढ झाली. मात्र, नंतरच्या काळात सती प्रथेला विकृत स्वरूप आलं," असं शिवा काळे म्हणाले. "मेळघाटात सात, आठ ठिकाणी सतीशिळा बघायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्र किंवा कर्नाटकात मोठ्या प्रमाणात सतीशिळा आढळतात. मेळघाटात गवळी समाजामध्ये सतीशिळांची पूजा केली जाते. मेळघाटात असणारा गवळी समाज हा लढवय्या यादव साम्राज्यापैकीच एक असावा, या समाजाच्या स्त्रियांनीही संघर्षात सहभाग घेतला. अनेक लढायांमध्ये त्या सहभागी होत्या, या महिलांना आलेल्या वीर मरणाचं प्रतीक म्हणून या भागात सतीशिळा निर्माण करण्यात आल्या," असं देखील शिवा काळे सांगितलं.
महाभारतात सती प्रथेचा उल्लेख : "महाभारताच्या काळात माद्री ही पंडू राजाची बायको सती गेल्याचा उल्लेख येतो. पाचव्या शतकात गुप्त घराण्याचं राज्य भारतात होतं. त्यामध्ये गोपीनाथ नावाचा एक मांडलिक राजा होता, त्याची बायको देखील सती गेल्याचा उल्लेख आहे. आठव्या शतकाच्या शेवटी सम्राट हर्षवर्धनची बहीण राजश्री ही सती जाण्यास तयार झाली, मात्र हर्षवर्धननं तिला जाऊ दिलं नाही. या प्रसंगाचा उल्लेख बाणभट्टांच्या हर्षचरित या ग्रंथात येतो," अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी "ईटीव्ही भारत" शी बोलताना दिली.
बाराव्या शतकात रूढ झाली प्रथा : "भारतात सती प्रथा ही 12 व्या शतकात रूढ झाली. आपल्या पतीसोबतच स्त्रियांना जिवंत जाळणं याच काळात सुरू झालं. सतीच्या नावाखाली संपत्तीचं हरण करणं, हा कदाचित त्यावेळचा उद्देश असावा. या प्रथेसाठी महिलेच्या दिराकडूनच हट्ट केला जात होता आणि या प्रथेला तत्कालीन समाज व्यवस्थेनं देखील मान्यता दिली असावी," अशी मांडणी प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी केली.
सती प्रथेविरुद्ध कायदा : "बंगालमध्ये कुलीन ब्राह्मण समाजात सती प्रथा फार मोठ्या प्रमाणात होती. या प्रथेविरोधात सर्वात आधी राजा राममोहन राय यांनी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंगला विनंती केली. लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्या सल्ल्यानेच राजा राममोहन राय इंग्लंडला गेले. त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रतिनिधींसह पार्लमेंटच्या सदस्यांची राजा राममोहन राय यांनी भेट घेतली. या कुप्रथेसाठी राजाराम मोहन राय यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि 4 डिसेंबर 1829 ला भारतात सतीबंदी कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिंगनं लागू केला. या कायद्यामुळं या अमानुष प्रथेला आळा बसला," असं प्राध्यापक डॉ. वैभव मस्के म्हणाले.
सतीशिळा 'या' पराक्रमाचं प्रतीक : "सती प्रथा हा निश्चितच क्रूर प्रकार होता. मेळघाटात असलेल्या या सतीशिळांचा मात्र अशा कुप्रथेशी संबंध नाही. या सतीशिळा खऱ्या अर्थानं महिलांच्या पराक्रमाचं प्रतीक आहेत. या सतीशिळा घडलेल्या ऐतिहासिक घटनांचं प्रतीक आहेत. मुळात या सतीशिळांना इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे," असं देखील प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.
'ती' सती गेल्यानं राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार बरखास्त : घातक असणारी सती प्रथा 1829 मध्येच बंद झाली असताना अगदी अलीकडच्या काळात 1986 या वर्षी राजस्थानमध्ये रूप कंवर नावाची एक महिला तिच्या पतीच्या निधनानंतर सती जायला निघाली. तत्कालीन प्रशासनानं कुठलीही आडकाठी न आणता यात्रेचं आयोजन होऊ दिलं आणि हजारो लोकांसमोर ती महिला सती गेली. या दुर्दैवी घटनेनंतर वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजस्थानमध्ये असणारं त्यांच्याच काँग्रेस पक्षाचं सरकार कलम 356 अंतर्गत बरखास्त केलं," अशी माहिती देखील प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी दिली.
सती प्रथा ही कुप्रथा आहे. तिचं उदात्तीकरण करण्याचा 'ईटीव्ही भारत' चा कोणताही हेतू नाही. तत्कालीन समाजव्यवस्थेतल्या समाजभावनेनुसार स्त्रीच्या सन्मानाचं, शौर्याचं प्रतीक ठरलेल्या सतीच्या त्यागाबाबत आदर व्यक्त करण्याची पद्धत होती. कालांतराने या प्रथेचा प्रवास सामाजिक विकृतीच्या दिशेने झाला. चुकीच्या रुढी-परंपरांना विरोध करण्याचा पुरोगामी महाराष्ट्राचा वसा 'ईटीव्ही भारत'नेही अंगिकारला आहे.
हेही वाचा