मुंबई Dharavi News : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या समर्थनार्थ काही स्थानिक नागरिक उभे राहू लागले आहेत. धारावी पुनर्विकास मार्गी लागावा, यासाठी जन आंदोलन करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतलाय. तसंच, शासकीय सर्वेक्षणालादेखील वाढता पाठिंबा मिळू लागलाय. याबाबत नुकतीच 'धारावी बनाव आंदोलन समिती'नं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट (डीआरपी)चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर श्रीनिवास यांची भेट घेतली. तसंच स्थानिकांचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली.
काही जणांकडून या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली जात आहे. मात्र, शासकीय सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करावं जेणेकरुन या प्रकल्पाला गती मिळेल, अशी भूमिका 'धारावी बनाव आंदोलन समिती'नं घेतली आहे. सर्व्हेक्षणात अडथळा आणणारे लोक कायद्याचं उल्लंघन करत असल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
धारावी बनाव आंदोलनच्या शिष्टमंडळासोबत आपली चर्चा झाली. त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारले आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल. धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र आणि अपात्र दोन्ही रहिवाशांना घर दिले जाईल. पात्र रहिवाशांना धारावीतच 350 चौरस फुटाचे तर अपात्र रहिवाशांना मुंबईत 300 चौरस फुटाचे घर दिले जाणार आहे. या प्रकल्पातील की टू की (key to key) वचनामुळे बहुतांश रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवले जाणार नाही. त्याऐवजी त्यांना थेट नव्या घराची चावी देण्यात येईल. प्रदूषण विरहित कायदेशीर उद्योगांना आणि व्यवसायांना धारावीतच जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. - एस व्ही आर श्रीनिवास, मुख्य कार्यकारी अधिकारी (धारावी पुनर्विकास प्रकल्प)
शासकीय सर्व्हेक्षणात अडथळा आणणाऱ्यांविरोधात कारवाई करा-धारावी बनाव आंदोलन समितीच्या शिष्टमंडळानं श्रीनिवासन यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात दीपक कैतके, दीपक पवार, शैलेंद्र कांबळे, राजा अदाटे, श्रीकुमार जयस्वाल यांचा समावेश होता. "धारावीत वास्तव्य नसलेले काहीजण या प्रकल्पाच्या शासकीय सर्व्हेक्षणात अडथळा आणत आहेत. यामाध्यमातून स्वतःचा राजकीय आणि आर्थिक लाभ करुन घेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात कारवाई करावी," अशी मागणी दीपक कैतके यांनी केली. तर धारावीत वास्तव्यास असणाऱ्या खऱ्या धारावीकरांची भूमिका जाणून घेण्यासाठी धारावी बनाव आंदोलन समितीसोबत सरकारनं संवाद साधण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- "उद्धव ठाकरेंनी अदानींकडून चंदा घेतला की नाही? हिम्मत असेल तर...." - Dharavi Redevelopment Project
- धारावी पुनर्विकासात मदर डेअरीच्या जागेवरून वाद: आदित्य ठाकरे वर्षा गायकवाड यांनी दिली भेट - Dharavi Redevelopment Project
- मुंबईतील तब्बल 1253 एकर मोक्याची जागा अदानी समूहाला; राजकारण तापलं - Mumbai Land To Adani Group