मुंबई - सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झालीय. २९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 30 ऑक्टोबर हा अर्जाची छाननी करण्याचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यातील अनेक महत्त्वाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यावेळी मुंबई, ठाण्यासह राज्यभरात शक्तिप्रदर्शन करत आणि मिरवणूक काढत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आलेत.
फडणवीसांच्या मिरवणुकीत गडकरींची उपस्थिती : गुरुवारी अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी (25 ऑक्टोबर) रोजी महत्त्वाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. सहाव्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संविधान चौक ते आकाशवाणी चौकादरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फडणवीसांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज दाखल करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच अन्य नेत्यांनी हजेरी लावलीय. "जनतेला माझ्या कामावर विश्वास आहे आणि नक्की जनता मला मतदान करतील, निवडून देतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. तर सहाव्यादा देवेंद्र फडणवीस अर्ज दाखल केलाय, त्यामुळे जनतेनं त्यांना आशीर्वाद द्यावेत," असं गडकरी म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांची हजेरी : दुसरीकडे भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी सपत्नीक वांद्रे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी शेलारांनी सपत्नीक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दरम्यान, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी जल्लोषात रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले आणि चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रताप सरनाईक यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरलाय. तर याच मतदारसंघातून उबाठा गटाचे नरेश मनेरा यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय. इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) दत्ता भरणे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून, हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे असा सामना रंगणार आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुंबई शिवडीतून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. राजकारणात मला ठाकरे कुटुंबांने संधी दिली, बाळासाहेब आणि मीनाताई त्यांचा मी कायम ऋणी राहीनच, अशी प्रतिक्रिया अर्ज दाखल करताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलीय. नालासोपारा विधानसभेचे भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय.
हेही वाचा :