मुंबई Devendra Fadnavis Election Campaign : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया टीम मार्फत जोरदार प्रचार केला जातो. त्यांनी यावेळी संतांच्या वचनांचा आधार घेत प्रचार सुरू केला आहे. केंद्र सरकारने केलेली कामं आणि संतवचनांचा वापर ते करत आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांच्या ओव्या किंवा अभंगांचा संदर्भ देत त्यादृष्टीने मोदी सरकारने केलेल्या कामांचा दाखला देत आहेत. मतदानासंबंधी आवाहन करताना मतदानाच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संदेश देत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, कू, टेलिग्राम, शेअरचॅट, व्हॉटसअॅपचा प्रभावी वापर देवेंद्र फडणवीस करतात.
किती आहेत फॉलोअर्स : देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर 59 लाख फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 92 लाख फॉलोअर्स तर इंस्टाग्रामवर 20 लाख फॉलोअर्स आहेत. कू वर 9 लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत. शिवाय व्हॉटसअॅप आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमांतून कोट्यवधी लोकांपर्यंत ते थेट संपर्कात असतात. त्यामुळे या प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर मोदी सरकारच्या कामांच्या प्रचारासाठी करण्यात येत आहे. दररोज संतवचनाच्या माध्यमातून प्रचार 15 एप्रिलपासून दररोज एका संत वचनाचा आधार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना ते समाज माध्यमावर टाकत आहेत. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या ओव्यांच्या किंवा अभंगांच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. 20 मे पर्यंत ही संतवचन मालिका सुरू राहणार आहे.
मोदी सरकारच्या कामातून संतांचा संदेश - फडणवीस : याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. आपल्या संतसाहित्यात विकासाच्या अनेक संकल्पना सापडतात. आज केंद्रातील मोदी सरकार जी कामे करत आहे, त्यात संतांचा संदेश कसा हुबेहुब आढळून येतो, हेच सप्रमाण देण्यासाठी ही एक अभिनव कल्पना मला सुचली आणि त्यादृष्टीनेच 15 एप्रिलपासून मी दररोज एक ट्विट करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत 20 मे पर्यंत मी दररोज अशी एक पोस्ट माझ्या समाजमाध्यमांवरील सर्वच व्यासपीठांवर करणार आहे. या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होते आणि संतांच्या या भूमीतील मतदारांना योग्य संदेश देता येतो, असंही ते म्हणाले.
हेही वाचा:
- मुख्यमंत्र्यांच्या नगर विकास खात्याचा 800 कोटींचा घोटाळा, संजय राऊतांचा गंभीर आरोप - Sanjay Raut Allegation
- लोकसभा निवडणूक 2024 : मोदी की गादी, नणंद की भावजय? ; जाणून घ्या उद्या कोणत्या दिग्गजांमध्ये रंगणार सामना - Lok Sabha Elections 2024
- माणूस जातीनं नाही, तर गुणानं मोठा असतो; जातीचं राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितीन गडकरींनी फटकारलं - Lok Sabha Election 2024