मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा (Maharashtra Assembly Election 2024) होऊन चार दिवस उलटले, तरीसुद्धा महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्या जागावाटपांचा घोळ अद्याप कायम आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते सुद्धा यंदा कापले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं उमेदवार बंडखोरी करू नयेत या दृष्टिकोनातून जागावाटप होण्यास विलंब होत असल्याचं कारण पुढे आलं आहे. त्यातच नाराज नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती सुद्धा आखली आहे.
संधी न भेटल्यास पर्यायी मार्ग : १५ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात निवडणुकीची घोषणा केली. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली. इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असून, आमदारकीची संधी न भेटल्यास पर्यायी मार्ग सुद्धा शोधून ठेवला आहे. याच कारणाने पक्षात होणारी बंडखोरी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पडतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. आज किंवा उद्या जागावाटप घोषित होईल, अशी घोषणा महायुती तसेच महाविकास आघाडीचे नेते वारंवार करत असले तरी जागावाटप व उमेदवारांची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल हे त्यांनाही माहित आहे. ही बंडखोरी थांबविण्यासाठीच दोन्ही बाजूने सावध पवित्रा घेतला जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त राजकीय पक्ष : यंदाच्या निवडणुकीत कधी नव्हे इतके पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राज्यात एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे आता ६ महत्त्वाचे पक्ष निर्माण झाले आहेत. शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, भाजपा व काँग्रेस हे ६ प्रमुख पक्ष आहेत. त्यातच समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, प्रहार जनशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्ष व इतरही छोटे घटक पक्ष आपली ताकद लावणार असल्याने नाराज उमेदवारांसाठी यंदा अनेक पक्षांचे पर्याय असणार आहेत.
महायुतीचं जागावाटप कुठपर्यंत? : पहिला महत्त्वाचा मुद्दा हा जागावाटप व दुसरा मुद्दा हा उमेदवारांचा असणार आहे. २०१९ च्या तुलनेत यंदाची राजकीय परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. २०१९ मध्ये शिवसेना राज्यात १२४ जागांवर लढली होती. तर भाजपा १६४ जागा लढली होती. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किमान ११० ते १२० जागा हव्या आहेत. तर भाजपा १५० ते १६० जागा लढण्यास आग्रही आहे. त्यातच अजित पवार गटाने सुद्धा किमान ८० जागांची मागणी केली असल्याने महायुतीत जागावाटप कळीचा मुद्दा बनला आहे.
महाविकास आघाडीचं जागावाटप कुठपर्यंत? : दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्या आहेत. त्यातच विदर्भातील ८० टक्के जागांवर काँग्रेस दावा करत आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किमान १२० जागा हव्या आहेत. अशात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७५ ते ८० जागांची मागणी केली असल्याने इथेही अद्याप जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत हे दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी बोलणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्ही बाजूने जागावाटपाचा तिढा ८० टक्के सोडवला गेला असल्याचा जरी दावा केला गेला असला तरी सुद्धा जागावाटपाबरोबर उमेदवारांचा तिढा हा दोघांसाठी डोकेदुखीचा ठरत असल्याने जागावाटपास विलंब होत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा -