अमरावती Death Threat To PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा कॉल थेट इंग्लंडवरुन आलाय. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या फोनवर सोमवारी (11 मार्च) सकाळी एका अज्ञात व्यक्तीनं कॉल करत पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लगेच शिवराय कुलकर्णी यांनी बडनेरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तर गेल्या दोन वर्षांमध्ये राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ झाली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात काहीसं चिंतेचं वातावरण बघायला मिळतंय.
![Death threat to Prime Minister Narendra Modi state spokesperson of BJP Shivaray Kulkarni received a call from England](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-03-2024/20957690_narendra-modi.jpg)
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत उडवणार : शिवराय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात रक्तपात न करता 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' ची इमारत बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देखील या फोन कॉलद्वारे देण्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली तर भारत कमजोर होईल, असं देखील या कॉलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीनं म्हटलंय. कुलकर्णी यांना +447537168320 या क्रमांकावरुन सकाळी 11 वाजून 18 मिनिटांनी कॉल आला होता. या कॉलवर युनायटेड किंगडम असं नमूद होतं. तसंच धमकी देणाऱ्या व्यक्तीनं आपण खलिस्तानी समर्थक असल्याचं म्हटल्याचंही शिवराय कुलकर्णी यांनी सांगितलं.
बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार : या गंभीर प्रकाराबाबत शिवराय कुलकर्णी यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारी सोबतच फोन कॉलचे डिटेल्स आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांना सादर करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास व्हावा, अशी मागणी देखील शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.
हेही वाचा -