मुंबई Worli Hit And Run Case : पुण्यानंतर आता मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना रविवारी पहाटे घडली. ॲट्रीया मॉलजवळ एका कोळी दाम्पत्याला पहाटे एका BMW गाडीनं उडवलं. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मृत महिलेचा पती प्रदीप नाखवा (Pradeep Nakhwa) यांनी आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली.
मिहीरच्या वडिलांना अटक : वरळी पोलिसांनी कारमध्ये उपस्थित असलेले राजेंद्रसिंग बिदावत आणि आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांना अटक केली आहे. मिहीर शाह फरार असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली.
मिहीरने मद्यप्राशन करुन गाडी चालवली? : आरोपी मिहीर शाह याने अपघातापूर्वी मद्यप्राशन केलं असल्याची माहिती समोर आली. "अपघातावेळी मिहीर स्वतः गाडी चालवत होता, अशी माहिती मृत महिलेच्या पतीने दिली. अपघातापूर्वी तो जुहू येथील बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता आणि तिथे त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केलं. मद्यप्राशनाचे, बारचे बिल १८ हजार रुपये झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याप्रकरणी बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. मद्यप्राशन करुन झाल्यानंतर तो गोरेगाव येथे गेला आणि तिथून परत मुंबईत आला. त्यानंतर त्याने वरळीतील मॉलजवळ दुचाकीला मागून ठोकले आणि त्यामध्ये महिलेला फरफटत नेलं. त्यामुळं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ब्रेक लावला असता तर महिलेचा जीव वाचला असता : "हा अपघात झाला तेव्हा वाहन चालवत असलेल्या व्यक्तीनं तत्काळ ब्रेक लावून गाडी थांबवली असती तर, महिलेचा जीव वाचला असता. मात्र, पळून जाण्याच्या हेतूने त्याने महिलेला फरफटत नेल्यामुळं महिलेचा मृत्यू झाला," असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. "अपघातावेळी गाडी चालवत असलेल्या व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, आरोपी कोणीही असला तरी त्याला सोडू नये, राजकीय लागेबांधे वापरुन त्याला वाचवले जाता कामा नये, त्याच्याविरोधात कडक कारवाई करावी," अशी मागणी देशपांडे यांनी केली. याप्रकरणी आपण पाठपुरावा करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Visited the Worli Police Station today and met with senior police officers investigating into the hit and run case that occurred in Worli today.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2024
I will not go into the political leanings of Mr Shah, the accused of the hit and run, but I hope the police will act swiftly to catch… pic.twitter.com/LjiWyoRx3M
आदित्य ठाकरेंनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट : "वरळीमधील घटनेत मृत्यू झालेल्या नाखवा कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. आदित्य ठाकरे हे पीडित कुटुंबीयांना न्याय देण्याकरिता पोलीस स्टेशनमध्ये गेले. परंतु अशा दुःखद घटनेमधूनसुद्धा राजकीय लाभ घेण्याचा जो काही केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत, त्याचा मी निषेध करतो," अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
आरटीओ अधिकाऱ्यांनी केली पाहणी : या अपघातातील बीएमडब्ल्यू कारची पाहणी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलीय. ही अपघातग्रस्त गाडी सध्या वरळी पोलीस स्थानकाच्या प्रांगणात ठेवण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी या कारची तपासणी करुन त्याची माहिती घेतली आहे. कोणते दंड आकारले आहे का? याची आणि इतर बाबींची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी घेतली.
वरळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल : रविवारी सकाळी प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी दुचाकीवरुन वरळी कोळीवाडाकडे जात होते. त्यादरम्यान लँडमार्क शोरुम समोर एका बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला पाठून धक्का दिला. या अपघाताची माहिती मिळताच वरळी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी महिला कावेरी नाखवा (वय ४५ वर्षे ) यांना नायर रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन गेले. रुग्णालयात उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलंय. या प्रकरणी कलम १०५,२८१, १२५, २३८, ३२४ (४) व मोटार वाहन अधिनियम कलम १८४, १८७,१३४ , १३४ (ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा -