मुंबई Dahi Handi 2024 : दहीहंडीचा सण हा नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. देशभरात उद्या (27 ऑगस्ट) दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मुंबईत दहीहंडी म्हणजे एक वेगळा जोश, उत्साह असतो. मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा मान मिळावा यासाठी गोविंदा पथकांची धडपड सुरू असते. गोविंदा पथकं मुंबईत मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. मुंबईतल्या दहीहंडी उत्सवाकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. इथल्या दहीहंडी उत्सवाला अनेक बडे सेलिब्रिटी हजेरी लावतात, लाखोंची बक्षिसे जाहीर केली जातात आणि त्यासोबतच विक्रमी उंचच उंच मानवी मनोरे सर्वांचं लक्ष वेधून घेतात.
यावर्षीच्या दहीहंडीला मात्र, काहीसं राजकीय स्वरूप पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे दहीहंडीवरही निवडणुकीचा रंग स्पष्ट दिसत आहे. गोविंदांमध्ये वाटण्यात येणाऱ्या टी-शर्टवर पक्षांची ओळख आणि त्यांच्या नेत्यांची छायाचित्रं छापण्यात आली आहेत. जेणेकरून दहीहंडीसोबतच तरुणांमध्ये पक्षाचा प्रचार देखील होईल. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला मुंबईत साजऱ्या होणाऱ्या प्रसिद्ध दहीहंड्यांविषयी सांगणार आहोत.
1) जांबोरी मैदान, वरळी : भाजपा नेते संतोष पांडे यांनी जांबोरी मैदान, वरळी येथे दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं असून या दहीहंडीसाठी 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलय. यंदा या दहीहंडीतील चर्चेचा विषय म्हणजे संतोष पांडे यांची दहीहंडी वरळीच्या जांबोरी मैदानावर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटाची दहीहंडी येथे होत होती. मात्र, यावर्षी भाजपाची दहीहंडी होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. याच मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस ठेवण्यात आल्यानं त्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांचा असल्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक बडे नेते येथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
प्रथम पारितोषिक 3 लाख 33 हजार 333 रुपये : या दहीहंडी संदर्भात संतोष पांडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं, "यंदा दहीहंडीच्या माध्यमातून आपला इतिहास लोकांसमोर मांडणार आहोत. त्यामुळे यंदा अफझल खानाच्या वधाचा चलचित्र देखावा मुंबईकरांसमोर ठेवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुंबईकरांसमोर मांडणार आहोत. यंदाच्या दहीहंडीत प्रथम पारितोषिक 3 लाख 33 हजार 333 रुपये आहे, असं संतोष पांडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
2) घाटकोपर : दहीहंडीचा थरार अनुभवायचा असेल तर घाटकोपर हा उत्तम पर्याय आहे. भाजपा आमदार राम कदम यांची घाटकोपरची दहीहंडी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्यांच्या दहीहंडीला अनेक बड्या बॉलीवूड सेलिब्रिटींची उपस्थिती असते. राम कदम यांनी यावर्षी देशातील सर्वात मोठी दहीहंडी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. राम कदम यांची दहीहंडी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिली आहे. काही वर्षांपूर्वी राम कदम यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
3) लालबाग : अनेकांना लालबाग फक्त गणपती मुळेच माहीत आहे. पण, येथील दहीहंडी देखील तितकीच प्रसिद्ध आहे. पारंपारिक दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी लालबाग हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यासोबतच लोअर परळमधील जय जवान मित्र मंडळाचीही दहीहंडी पाहण्यासारखी असते. या दोन्ही दहीहंडींचं वैशिष्ट्य म्हणजे सणाचं पावित्र्य राखत पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जाणारा दहीकाला.
4) देवीपाडा मैदान, बोरिवली : बोरिवली, पूर्व देवीपाडा येथील मैदानावर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. दहीहंडी फोडण्यासाठी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनीही अशोकवन येथे दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. सांताक्रूझ पूर्व स्थानकासमोर गेल्या 20 वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं आहे.
बदलत्या काळानुसार दहीकाल्याचा उत्सवही बदलला आहे. दहीहंडी स्पर्धा आयोजित करणारी अनेक मंडळे चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना आमंत्रित करतात. करोडो रुपये खर्च केले जातात. दहीहंडी उत्सवाची लोकप्रियता आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता नेतेही या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत.
हेही वाचा