मुंबई Areca Nut Smuggling : सीमाशुल्क विभागानं जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस (JNCH) न्हावा शेवा बंदरात सुपारीची तस्करी करणाऱ्या 10 कंटेनरवर कारवाई केली. या कारवाईत सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 112.14 मेट्रीक टन सुपारी जप्त केली. या सुपारीची किंमत 5.7 कोटी इतकी असून तब्बल 6.27 कोटी रुपयाचा कर चुकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कंटेनरमध्ये सुपारीऐवजी बिटुमेन असल्याचं कागदोपत्री नमूद करण्यात आलं होत.
दहा कंटेनरमधून सुपारीची तस्करी : न्हावा शेवा येथील विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयित 10 कंटेनर थांबवून त्यांची कसून तपासणी केली. यावेळी बिटुमनची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रममध्ये सुपारी लपवून तस्करी करण्यात येत होती.
संघटित आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटचा भाग : नाव्हा शेवा बंदरात पकडण्यात आलेल्या तस्करीत तस्करांनी सुपारी कंटेनरमध्ये ठेवलेल्या बिटुमेनच्या ड्रममध्ये लपवण्यात आली. सुपारीची तस्करी करण्यासाठी बिटुमेन ड्रम लोड करुन तस्करांनी अनोखी पद्धत अवलंबली. सहसा सुपारी पिशव्यामध्ये भरुन आयात केली जाते, तर बिटुमेन धातूच्या ड्रममध्ये आयात केले जातात. अशा पद्धतीनं बिटूमेनच्या आड सुपारीची तस्करी करण्याची शक्कल सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आली. त्यामुळे ही संघटित आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचं दिसून येत असल्याचं सीमा शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.
या अगोदर केली होती 190 मेट्रीक टन सुपारी जप्त : नाव्हा शेवा बंदरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी 10 कंटेनर संशयास्पद वाटल्यानं त्यांनी या कंटेनरची तपासणी केली. त्यानंतर या कंटेनरमध्ये तस्करीची सुपारी असल्याचं स्पष्ट झालं. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तस्करी करण्यात येणारी सुपारी जप्त करत कारवाई केली. विशेष म्हणजे या अगोदर नाव्हा शेवा बंदरात 190 मेट्रीक टन सुपारी जप्त करण्यात आली. भारत हा जागतिक स्तरावर सुपारीचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तरीही अवैध गुटखा उद्योगाला पुरवठा करण्यासाठी सुपारीची तस्करी सुरुच असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :