पुणे Pune Crime News : भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. आजही आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे म्हणून अनेकांचा आटापिटा सुरू असतो. तर मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या असतील. अशीच एक घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे. एका 23 वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात (Abortion At Home) केल्यामुळं मृत्यू झाला. ऋतुजा राहुल धोत्रे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून राहुल भिमराव धोत्रे, लक्ष्मी भिमराव धोत्रे आणि भिमराव उत्तम धोत्रे सर्व (रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे) अशी आरोपींची नावं आहेत. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात असून असं कृत्य केल्यानं या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
घरीच गर्भपात केल्यानं मृत्यू : इंदापूर तालुक्यातील वडापुरीत एका 23 वर्षीय गर्भवती महिलेचा घरीच गर्भपात केल्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसात मयत महिलेचा पती, सासु-सासरे अशा तिघांवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 90, 91, 85, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचा भाऊ विशाल शंकर पवार यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्भक पुरले जमीनीत : ऋतुजाचा वडापूरी येथील राहुल धोत्रे याच्याशी सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. तिला एक मुलगा एक मुलगी अशी अपत्ये आहेत. ती चार महिन्यांची गर्भवती असताना कुटुंबीयांनी तिची गर्भ तपासणी केली. तिच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आहे हे माहिती झाल्यानंतर पती, सासू-सासरे या सर्वांनी मिळून खासगी डॉक्टर घरी बोलावून ऋतुजाला गर्भपात होण्याच्या गोळ्या औषधे देवून तिचा रविवारी गर्भपात केला. त्यानंतर चार महिन्यांचे स्त्री जातीचे भ्रुण स्वरुपातील अर्भक जमीनीमध्ये पुरले. यामध्ये ऋतुजाचा अतिरक्तस्त्राव झाल्यानं सोमवार (23 सप्टेंबर) ला तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गटकुळ करत आहेत.
गुन्हा दाखल : याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड म्हणाले की, नातेवाईकांनी केलेल्या आरोपावरून संबंधित महिलेचा घरगुती गर्भपात केल्यानं मृत्यू झाला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील ठोस कार्यवाही करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
- 15 वर्षीय मुलीनं 27 आठवड्याचा गर्भपात करावा की जन्म द्यावा? मुंबई उच्च न्यायालयानं दिले महत्त्वाचे निर्देश - Mumbai HC On Girl Abortion Case
- दहावी नापास मुन्नाभाईनं संपूर्ण मराठवाड्यात पसरविलं गर्भलिंग निदानाचं जाळं, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR crime
- WOMENS FREEDOM REPRODUCTIVE AUTONOMY : गर्भपाताबरोबरच पुनरुत्पादकतेच्या कठीण निर्णयात स्त्रीची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य महत्वाचे