मुंबई Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर विधानसभेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आतापासूनच राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढल्याने विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
काँग्रेस स्वबळावर लढणार नाही : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, अशा प्रकारचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली. त्यात आता संजय राऊतांनीही उडी घेतली आहे. काँग्रेसच्या वाढलेल्या जागेत आमचाही वाटा असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. "काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास जरी वाढला असला तरी ते एकटे लढणार नाहीत", असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलं : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठकांचं सत्र सुरू झालंय. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांत काही जागांवर एकमत झालं असलं तरी त्यांच्यामध्ये धुसफूस असल्याची बाब समोर आली. संजय राऊत यांनी आपल्या भाषेत काँग्रेस पक्षाला खडसावलं. "लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तीन जागा आमच्यामुळं वाढल्या. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? एकट्याचा आत्मविश्वास वाढला असं जर कोणाला वाटत असेल तर तो अभ्यासाचा विषय आहे", असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्ष काँग्रेसला सुनावलं.
तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी : नव्यानं तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीसोबत महाविकास आघाडीचं काही बोलणं झालंय का? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते." तसंच महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांबरोबरच सोबत असलेल्या लहान पक्षांना सामावून घेण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीला मजबुतीने सामोरे जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी येतात आणि फिती कापून जातात : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वर्धा दौऱ्यावर आले होते. यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि फिती कापून जातात, उद्योगाचं काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "आजही एक मोठा उद्योग गुजरातला गेला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली माहिती अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात उद्घाटन करण्यापेक्षा मोदींनी महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या उद्योगांना थांबवण्याचे काम करायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर जाणारे उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न मोदींनी करावा", अशा प्रकारची विनंती संजय राऊत यांनी केली. भाजपाच्या नेत्यांना भडकावू विधाने करून राज्यात दंगली घडवायच्या असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.