मिरा भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये काँग्रेसकडून जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून अजून अनेकांची उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र मिरा भाईंदरमध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. एका बाजूला भाईंदरमध्ये भाजपाकडून भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं तर महाविकास आघाडीचे संभव्य उमेदवार मुझफ्फर हुसैन यांनी मिरारोडमध्ये नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच उमेदवारी जाहीर होईल, "मी निवडून आल्यावर अनेक समस्या शहरात आहेत. त्या सोडवून आपला विश्वास सार्थ ठरवणार," असं मुझफ्फर हुसैन यांनी सांगितलं.
राज्यात निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर जरी झाली नसली तरी उमेदवारी आपल्यालाच मिळणार या आशेनं अनेकजण कामाला लागले आहेत. मिरा भाईंदर विधानसभा हा चर्चेचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. अद्याप कोणत्याच पक्षानं अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. मात्र इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवारी भाईंदरमध्ये भाजपाकडून भव्य संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं तर मिरारोड परिसरात महाविकास आघाडीचे संभव्य उमेदवार मुझफ्फर हुसैन यांनी जनसंवाद सभेचं आयोजन केलं.
मिरा भाईंदर शहरात सध्या अपक्ष आमदार गीता जैन असून २०१९ च्या निवडणुकीत भाजपाकडून तिकीट नाकारल्यानं अपक्ष निवडणूक लढवून भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. तर तिसऱ्या क्रमांकावर मुझफ्फर हुसैन होते. पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून गीता जैन, नरेंद्र मेहता आणि रवी व्यास इच्छुक असून पक्ष कोणाला रिंगणात उतरवतो हे अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु तिकीट मिळो वा न मिळो निवडणूक लढायचीच असा चंग मेहता आणि जैन यांनी बांधला आहे.
महाविकास आघाडीकडून मुझफ्फर हुसेन यांची उमेदवारी निच्छित मानली जात आहे. त्यानुसार हुसैन यांनी मतदारसंघात जोरदार कामाला सुरुवात केली आहे. राज्यातील लोकसभेचे निर्णय पाहता हुसैन आणि महायुतीच्या उमेदवारात काटे की टक्कर होणार असं चित्र दिसत आहे. त्यानुसार चौक सभा, थेट जनतेशी संवाद हुसैन साधत आहेत.
मुझफ्फर हुसैन अभ्यासू,अनुभवी नेता - माजी आमदार मुझफ्फर हुसैन महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे जुने जाणकार, अभ्यासू आणि बुद्धिजीवी नेता म्हणून ओळखले जातात. मागील ४० वर्षाचा राजकीय अनुभव, मिरा भाईंदरचे उपमहापौर ते आमदार, सध्या प्रदेश कार्याध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. मागील अनेक वर्षे पक्षाच्या महत्त्वाच्या पदाची धुरा त्यानी सांभाळली आहे. दोनवेळा हुसैन यांना काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेत संधी देखील मिळाली आहे. उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून त्यांना पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं आहे.